मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार आहेत.
येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील. एकप्रकारचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केलं जाणार आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करतंय हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. प्रताप सरनाईकांसह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीची नोटीस आली आहे. ईडीच्या नोटीसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.
वर्षा राऊत 5 जानेवारीला ईडी चौकशीसाठी हजर राहतील अशी शक्यता आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याचं कळतं. 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते.
पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते.
हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.
संबंधित बातम्या