मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या उद्या 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी दाखल होणार होत्या. मात्र त्या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्या. दरम्यान, ईडी कार्यालयाबरोबर हळूहळू शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आम्ही राऊतांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत, या नोटिशीला घाबरत नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटिस बजावण्यात आली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.


दरम्यान, वर्षा राऊत यांना उद्या ऐवजी आज चौकशीसाठी परवानगी दिली याचा अर्थ ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही. आता वर्षा राऊत यांनी 55 लाखांचा काय झालं? कुठून आले ते सांगावं? अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.


55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंरत संजय राऊत यांनी ट्वीट केलं. होतं. कोणाचंही नाव न घेता त्यांनी लिहिलं होतं की, "आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया" तसेच 'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है', असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.


शिवसेना आक्रमक; ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार?


पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती.


'पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा' : संजय राऊत


ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक
गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता होती. उद्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात होतं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार होते, अशी माहिती मिळाली होती.



संबंधित बातम्या