मुंबई : भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने येणाऱ्या काही दिवसांत होणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिका निवडणुका आणि 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे. यासंदर्भाच आज भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका, त्यात असलेले स्थानिक नेतृत्त्वाचे विषय आणि विजयाचं गणित मांडण्यासाठीचा रोडमॅपचा रिव्ह्यू आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं. तसेच या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत सरकारवर टीकेची झोडही उठवली.


आशिष शेलार बैठकीत बोलताना म्हणाले की, "ज्या पद्धतीची दाणादाण सत्ताधारी पक्षांमध्ये उडाली आहे की, आजूबाजूला हात मारणं, प्रलोभनं दाखवून लोकं दुसऱ्या पक्षातील लोकं फोडून सत्तेचा दुरोपयोग करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत, पण त्यानंतरही त्यांच्या हाती यश लागणार नाही, या पद्धतीनं योग्य पद्धतीचं नेतृत्त्व आणि संघटनात्मक कामासाठी व्यक्तींच्या नेमणुका पाच महानगरपालिकांच्या दृष्टीने करण्यात येतील."


कितीही नौटंकी केली तरी मालवणचो खाजो पण आमचोच आणि फाफडा पण आपडोच : आशिष शेलार


"कोकण म्हणजे आम्हीच... अशा अहंकारी वृत्तीने वागणाऱ्यांचं वस्त्रहरण कोकणातील जनतेनं करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीत दोन अख्या ग्रामपंचायती, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मिळून 182 ग्रामपंचायतींचे भाजपचे सदस्य निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ कोकणचा कौल, आई भराडी देवीचा आशीर्वाद अन् कोकणच्या लालमातीतील फळरुपी आशीर्वाद हा भाजपच्या बाजूनेच आहे. निवडणूका अद्याप बाकी आहेत. पण हा शुभसंकेत आहे की, मुंबई आणि ठाण्यात आता शिवसेनेची हयगय जनता करणार नाही. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी मालवणचो खाजो पण आमचोच आणि फाफडा पण आपडोच.", असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


अरविंद सावंत यांनी श्रेय लाटण्याचं काम करु नये : आशिष शेलार


"मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव बदलण्याचं श्रेय घेण्याचं काम अरविंद सावंत यांनी करु नये. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव बदलण्याचा ठराव मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता. त्यानंतर तो केंद्राकडे गेला होता. त्यामुळे नाना शंकरशेठ यांच्या नावाचा सन्मान होईल आणि होणार, अशी भाजपची भूमिका आहे."


काँग्रेसच्या नशीबी सकाळ, दुपार, संध्याकाळ केवळ लाथा खाण्याचंचं काम : आशिष शेलार


"या सरकारच्या काळात काँग्रेसच्या नशीबी सकाळ, दुपार, संध्याकाळ केवळ लाथा खाण्याचंचं काम आहे. त्यामुळे दररोज लाथा आणि बुक्क्यांचा मार खात काँग्रेसचं जे होणारं विघटन टळूच शकणार नाही. शिवसेनेमुळं जर ते होत असेल तर त्याचा अभ्यास काँग्रेसनं केला पाहिजे."


त्यांनी केलं तर पळाले, आम्ही केलं तर फोडले : आशिष शेलार


फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "त्यांनी केलं तर पळाले, आम्ही केलं तर फोडले; हा दुटप्पीपणा जो या राजकीय पक्षांचा आहे. त्यातच त्यांचा गेम फेल झाल्याचं दिसतं. स्वतःची ताकद नसली. एका दुबळ्याला दुसऱ्या दुबळ्याचा हात पकडायला लागल्यावर, अशा प्रकारच्या राजकीय सत्तेचा दुरोपयोग करुन फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. यातूनच स्पष्ट होतंय की, त्यांच्याकडे मुद्दलमध्येच काही नाही, तर व्याज काय मिळणार."


कोकण म्हणजेच, बाळासाहेब; बाळासाहेब म्हणजेच कोकण : विनायक राऊत 


आशिष शेलार यांनी कोकणावरुन शिवसेनेवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, "भाजपकडून जो काही प्रयत्न सुरु आहे, कोकणात प्रवेश करण्यासाठी, तर कोकण म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजेच कोकण. शिवसेना आणि कोकण असलेलं समीकरण भाजपला कधीच तोडता येणार नाही. त्यांच्यात क्षमता नाही, त्यामुळे आम्हाला पर्वा करण्याची गरज नाही."