Sanjay Raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच... कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून पुन्हा कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना पुन्हा सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
![Sanjay Raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच... कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला Sanjay Raut Judicial Custody Patra Chawl Scam Mumbai Session Court Updates Sanjay Raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच... कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/19/a5702674b6af9f2777081cfd98803819166357914952425_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut Latest Updates : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून पुन्हा कुठलाही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना पुन्हा सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली.पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवत 31 जुलै रोजी ईडीने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी आज न्यायालयात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं 'स्पिरीट' असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांवर आरोप नेमके काय?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)