Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आता मराठी कार्यक्रमांना मराठीतच उपशीर्षके मिळणार आहेत. वरळी येथील दूरदर्शन केंद्रात 'मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा शुभारंभ करण्यात आला आहे.

मुंबई : दृकश्राव्य माध्यमांमध्ये म्हणजेच टीव्ही कार्यक्रमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके (Subtitles) उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन कौशल्य वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या क्रांतीकारक उपक्रमामुळे भाषा शिक्षणाला मोठी गती मिळेल, असा ठाम विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह (Brijesh Singh IPS) यांनी व्यक्त केला आहे.
वरळी येथील दूरदर्शन केंद्रात 'मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चे (Same Language Subtitling Center) उद्घाटन ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. दूरदर्शनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला दूरदर्शनचे उपसंचालक हेमंत देसाई, गणेश अय्यर आणि आयआयटी दिल्लीचे प्रा. ब्रिज कोठारी उपस्थित होते.
काय आहे हा अभिनव उपक्रम?
या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या 'सह्याद्री' वाहिनीवरील (Doordarshan Sahyadri) सर्व मराठी मनोरंजन कार्यक्रमांमध्ये आता मराठी भाषेतूनच देवनागरी लिपीत उपशीर्षके (Subtitles) दिली जाणार आहेत. राज्य शासन, प्रसार भारती, आयआयटी दिल्ली (IIT Delhi) आणि 'प्लॅनेट रीड' (Planet Read) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रादेशिक भाषेतील पहिला उपक्रम सुरू करण्याचा मान संपूर्ण देशात महाराष्ट्राला मिळाला आहे.
श्रवणदिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा
उपक्रमाचे उद्घाटन करताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, "मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात भाषा बोलणाऱ्या अनेकांना लिखित भाषेचे संपूर्ण विश्व अनुभवायला मिळत नाही. टीव्हीच्या पडद्यावर समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यास आशयाच्या संदर्भासह भाषा सहजपणे शिकता येते. विशेषतः श्रवणदिव्यांग व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना कथा व घटनाक्रम समजण्यासाठी हा उपक्रम अत्यंत वरदान ठरेल."
प्रा. ब्रिज कोठारी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा प्रसार आणि वाचनवृद्धीविषयी माहिती दिली, तर संतोष जाधव यांनी उपशीर्षक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमामुळे टीव्ही पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचे वाचन सुधारेल आणि मराठी भाषेचे नाते अधिक दृढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:






















