ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एका मंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांसमोर ठेवली.
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर ठेवल्या. आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलिनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं? असा सवाल त्यांनी केला.
मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो. आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.
ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच, वाचा प्रत्येक अपडेट
मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे. तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं.