ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहोत. उच्च न्यायालयासमोर देखील शासनानं आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय-काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितलंय. न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरु केलं आहे.  अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वचजण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती केलीये. 


राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. 


संप सुरु राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका : अनिल परब 


एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यानंतरही राज्यभरात कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा कामगारांना आवाहन केलं आहे. अनिल परब यांनी म्हटलं की,  हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परब म्हणाले. 


मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आली   


एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र या मोर्च्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही.  त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेली आहे मंत्रालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.  मंत्रालय परिसरात जमा होणारे एसटी कर्मचारी कार्यकर्ते यांना आझाद मैदानात पोलीस घेऊन जात आहेत.  शिवाय कुठल्याही प्रकारे मंत्रालयासमोर आंदोलन होऊ नये आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर लावण्यात आला आहे. 


एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात


एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. ठाण्यातील खोपट डेपो मधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह  बंद केले आहे.  सर्व कर्मचाऱ्यांना आपले कपडे आणि बॅगा घेऊन बाहेर काढले आहे. खोपट डेपो मॅनेजर यांनी दोन्ही विश्रांतीगृहांना टाळे ठोकले आहे.  


आंदोलनकर्त्यांना वाशी टोल नाक्यावर अडवलं


दरम्यान, आझाद मैदानाकडे जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना वाशी टोल नाक्यावर अडवलं जातंय. 50 आंदोलनकर्त्यांना वाशीत नवी मुंबई हायस्कुलमध्ये ठेवण्यात आलंय. 50 आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांचाही सहभाग आहे. दुसरीकडे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी मुंबईत दाखल होत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत येण्यासाठी मज्जाव करणार हे लक्षात घेऊन अनेक डेपोतील कर्मचारी रात्रीच मुंबईत दाखल झाले आहेत.