ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत चालला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा  एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की,  कोर्टानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे कमिटी नेमली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी कमिटीपुढे जाऊन मांडावी लागेल.  कमिटी जो अहवाल देईल तो सर्वांना लागू असेल.  इन्क्रिमेंटची मागणी वगळता माझ्या अखत्यारितील मागण्या मान्य झाल्या आहे.  कोर्टानं संप बेकायदेशिर ठरवलाय. कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी असेल, असं परब म्हणाले.  


ST Workers Strike: संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका : अनिल परब 


परब म्हणाले की, काल सदाभाऊ खोतांना मी समजावून सांगितलं, चर्चा झाली पण त्यांनी बाहेर जाऊन भलतंच सांगितलं.  दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी बोलायला मी केव्हाही तयार आहे.  संप सुरुच राहीला, तर एसटीचं मोठं नुकसान होईल.  कामगार राजकीय बळी ठरले तर ते दुर्दैवी आहे.  विलीनीकरणाची मागणी ताबडतोब 2-4 दिवसांत पूर्ण होणार नाही, वेळ लागेल, असं ते म्हणाले. 


ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच, वाचा प्रत्येक अपडेट


परब म्हणाले की, नेत्यांनी कर्मचाऱ्यांना भडकवले तर नुकसान कर्मचाऱ्यांचेच आहे. विलीनीकरणासंदर्भात आधीच कमिटी नेमलेली आहे, जीआर काढलाय, ही वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.  एसटी कर्मचा-यांविरोधात दावे दाखल करण्याबाबत कोणती कारवाई सुरुय मला माहित नाही, असंही परब यांनी सांगितलं. 


जर आम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करुच
परब म्हणाले की,  जर बेकायदेशीर संपाचं हत्यार उपसलं जात असेल तर आम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करुच.  ज्या पद्धतीची भाषणं सुरुयेत ती पाहता संप चिघळावा असे प्रयत्न सुरु आहेत.  आज जे मागण्यांकरता जोरजोरात बोलतायेत त्यांचं सरकार, मुख्यमंत्री होते. हाच न्याय एअर इंडियाला का नाही लावला.  आजचा दिवस मी पूर्णत: एसटी करता मोकळा ठेवलाय, नेत्यांनी यावं, चर्चा करावी.  राज ठाकरेंचा मला कोणताही फोन आला नाही, असं ते म्हणाले.  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विलीनीकरण शक्य नाही हा व्हिडीओ व्हायरल होतोय, जर तो अर्धवट व्हिडीओ असेल तर पूर्ण व्हिडीओ समोर आणावा, असंही परब म्हणाले. 


परब म्हणाले की, आत्महत्या हा काही पर्याय नाही. जो आत्महत्या करतो त्याचं कुटुंब उद्धवस्त होतं. कर्मचा-यांनी साथ दिली तर एसटीला पूर्वीचे दिवस येतील. माझ्याशी कोणताही कामगार येऊन चर्चा करु शकतो, असंही ते म्हणाले.