महाविकास आघाडीतील कुरबुरी संपेना, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही कुरबुरी नाहीत, असा दावा तिन्ही पक्षाचे नेते करत असले तरी त्यांच्यातील नाराजीनाट्य वारंवार समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असून त्यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी किंवा नाराजी संपण्याचं नाव घेत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजतं. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण संतप्त झाले. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या.
काँग्रेसची नाराजी आणि महाविकास आघाडीतील कुरकुर
काल (23 जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावरुन चांगलेच घमासान झाले असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्य़ाची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अशोक चव्हाण संतापले सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. तसंच अधिकारी विरुद्ध मंत्री असा सामनाही रंगलेला पाहायला मिळाला आहे. अधिकारी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना न सांगताच निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतात. सध्याच्या खात्यांचं विभाजन होऊन नवीन खाती निर्माण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांचं विभाजन करुन नवी खातं निर्माण करण्याचा प्रस्तावही अशोक चव्हाणांना न सांगता आणला होता. आता या विभागांना मंजुरी देण्याची वेळ आली तेव्हा देखील ती फाईल अशोक चव्हाणांसमोर ठेवली नव्हती. त्यामुळे अशोक चव्हाण तीव्र संतापले आणि त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
आधीही अशोक चव्हाणांची नाराजी "ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही," असं म्हणत अशोक चव्हाण यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली होती. तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र तरीही पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांना डावलून अधिकाऱ्यांनी परस्पर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याने ते नाराज आहेत.
संबंधित बातम्या
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठी तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाव्यात : अशोक चव्हाण
खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीत बसले आहेत : संजय राऊत