ठाणे : ठाण्यात सतरा रुग्णालयांनी तब्बल एक कोटी 82 लाख रुपयांची अवाजवी बिले आकारल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व अवाजवी बिलांची रक्कम रुग्णांना परत करावी असे आदेश आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले आहेत. कोरोना झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना हा एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल.


ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कोविड रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांची चौकशी सुरु केल्यानंतर तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची अवाजवी बिले आकारण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या रुग्णालयांच्या यादीमध्ये अनेक मोठी रुग्णालये देखील समाविष्ट आहेत. ठाणे महानगरपालिकेने रुग्णालयांच्या बिलांची फेरतपासणी करण्यासाठी नेमलेल्या लेखा परीक्षकांच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. "आम्ही ठरवून दिलेल्या रुग्णालयाच्या किंमतीपेक्षा जास्त बिल ज्यांनी आकारले आहेत, अशा रुग्णालयावर ही कारवाई करण्यात येत आहे. आम्हाला रुग्णालयं बंद करायची नाही तर रुग्णांची लूट थांबवायची आहे", असे आयुक्त विपीन शर्मा यांनी सांगितले.


याआधी लेखापरीक्षकांच्या अहवालात अवाजवी बिल आकारल्या प्रकरणी कोरेजन प्राईम हॉस्पिटलवर आयुक्तांनी मोठी कारवाई करत एक महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अशाप्रकारे पहिल्यांदाच मोठी कारवाई केल्यानंतर इतर सर्व रुग्णालयांचे धाबे दणाणले होते. लेखा परीक्षकांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार, 10 जुलै ते 21 ऑगस्टच्या दरम्यान विविध रुग्णालयांनी कोरोनाच्या उपचारासाठी पावणे दोन कोटींची आक्षेपार्ह रक्कम वसूल केली असल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. यामध्ये आतापर्यंत 4106 बिले तपासणीसाठी मिळाली असून 3347 बिले तपासण्यात आली आहेत. तर 26,68,964 इतकी रक्कम रुग्णांना परत देण्यात आली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण 17 रुग्णालयांनी अशा अवाजवी बिलांची आकारणी केली असल्याचे देखील अहवालात नमूद केले आहे.


कोणकोणती रुग्णालये आहेत?


वेदांत हॉस्पिटल, टायटन हॉस्पिटल, सिद्धिविनायक मॅटर्निटी हॉस्पिटल, आरोग्यं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कौशल्य हॉस्पिटल, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल, मेट्रो पॉल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, पणांदिकर हॉस्पिटल, एकता हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, सफायर हॉस्पिटल, काळसेकर हॉस्पिटल, वेल्लाम हॉस्पिटल, स्वयंम् हॉस्पिटल आणि दिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल


बिलांची आकडेवारी


एकूण प्राप्त देयके : 4106
तपासणी झालेली : 3347
आक्षेपार्ह देयके : 1362
जादा आकारणी केलेली देयकांची रक्कम : 1,82,39,776
रूग्णांस परत केलेली रक्कम : 26,68,964
खुलाशानुसार मान्य केलेली रक्कम : 15,27,019


पाहा व्हिडीओ : कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाण्यात, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीचाही आढावा



यापैकी काही महत्त्वाच्या हॉस्पिटल प्रशासनाशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी झालेल्या कारवाईबाबत उत्तर देण्याचे टाळले. तर मुंब्रा येथील काळसेकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रीन सौदागर ज्या सी ई ओ आहेत, काळसेकर हॉस्पिटलमध्ये, त्यांनी सांगितले की, "जर टीएमसीकडून आम्हाला तसे आदेश मिळाले तर आम्ही पैसे परत करू, मात्र अजून आम्हाला असे आदेश मिळाले नाहीत".


अवाजवी बिलासंदर्भात सर्वात प्रथम ठाण्यातील मनसेने आवाज उठवला होता. आता ही बाब अहवालात स्पष्ट झाल्यानंतर या रुग्णालयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील मनसे नेते संदीप पाचांगे यांनी केली आहे.


अवाजवी बिल आकारणाऱ्य रुग्णालयावर कारवाई होणे खरच गरजेचे आहे. मात्र केवळ ठाण्यामध्ये अशी बिले आकारली गेली नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णांची लूट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापक स्वरूपात ही कारवाई करणे आवश्यक आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


दिलासादायक! कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर देशात दुसऱ्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकावर


कोरोना काळात कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं पाहिजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना


मुंबई लोकल आणि ई पास बाबत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार