Sanjay Raut on Tipu Sultan controversy : मुंबईतील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजप आणि शिवसेना-काँग्रेसमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपकडून या उद्यानाच्या नावावरून मुद्दा तापवला जात असताना आता शिवसेनेनेही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला राजीनामा हवा असेल तर त्यांनी टिपू सुलतानचे गुणगान करणाऱ्या राष्ट्रपतींचा राजीनामा घेणार का, असा सवाल शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप इतिहासाचा ठेकेदार नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. 


मुंबईतील मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. बुधवारी या उद्यानाच्या उद्घाटनाआधी भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही (भाजप) इतिहासाचे ठेकेदार नाही, आम्हाला माहीत आहे टिपू सुलतान यांनी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला, कसे ब्रिटिशांच्या विरोधात लढले, हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही असेही राऊत यांनी म्हटले. 


भाजपने राष्ट्रपतींचा राजीनामा मागावा


राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे गुणगान केले होते. त्यामुळे आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का?  असा उलट प्रश्न राऊत यांनी भाजपला केला. टिपू सुलतानच्या नामकरणाचे काय करायचे यासाठी मुंबई महापालिका, महाराष्ट्र सरकार समर्थ असल्याचेही राऊत यांनी म्हटले. 


पाहा विशेष व्हिडिओ: Tipu Sultan: टिपू हिंदूविरोधी असल्याचा आरोप खरा आहे का? कोण होता टिपू सुलतान?


 



भाजपने पेटवापेटवीची भाषा करू नये; राऊतांचा इशारा


टिपू सुलतानच्या मुद्यावर आंदोलन करून राज्य पेटवण्याची भाषा तुमच्या तोंडी असेल तर पेटवापेटवीमध्ये महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 


इतर संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha