राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाआघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाआघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचा एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहिलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) संविधानाच्या चौकटीत बसवण्याची मागणी प्रकाश आंबेडकर सातत्याने करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याबाबत नेमका काय मसुदा हवा आहे, याबाबत आंबेडकर यांनी मुद्दे द्यावेत किंवा आंबेडकर स्वतः कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी मसुदा करुन घ्यावा अशी विनंती पत्राद्वारे करण्यात अली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला मसुदा सगळे पक्ष मान्य करतील, असं आश्वासन या पत्रात काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत यावं म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही प्रयत्न करत आहेत, हे यावरुन दिसून येत आहे.