कल्याण : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेवर पर्याय आहे. मात्र लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरेसा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे कोविड लसींच्या तुटवड्यामुळे इच्छा असूनही अनेक नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच लस मिळवण्यासाठी लोक आता कोणत्याही थराला जाण्यास प्रवृत्त झाल्याचे अंबरनाथ तालुक्यातील एका विचित्र घटनेमुळे समोर आले आहे. इथल्या मंगरूळ तालुक्यात असणाऱ्या आरोग्य केंद्रातून कोरोनाची लस समजून चक्क पोलिओ डोसची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील मंगरुळ आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केलं जातं. त्यामुळे या केंद्रावर लसींचा साठा असतो. या आरोग्य केंद्रात कोविड लस समजून लहान मुलांची पोलिओ लस चोरीला गेली असल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पोलिओ लसीची चोरी केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांनी आरोग्य केंद्रातील सीसीटीव्हीची व्हीसीआर आणि मॉनिटर देखील चोरून नेला आहे. आज सकाळी ही बाब उघडकीस आली. सुदैवाने या केंद्रावर लसींचा साठा शिल्लक नव्हता. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे आता आरोग्य केंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
- Covid 19 Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका नाही, एम्सच्या संचालकांचा दावा
- मोठा दिलासा...! आज राज्यातील एकूण 16 शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
- कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटो; सरकार म्हणतं, 'ज्यांचे पैसे, त्यांचाच फोटो'