नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्यनंतर आता काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र आजही रोज देशभरात सव्वादोन लाखांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट अद्याप ओसरलं नसताना सरकार आणि प्रशासनाला तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने पालकही चिंतेत होते. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असं वाटत नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. डॉ. गुलेरिया यांच्या दाव्यानंतर पालकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. 


कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित झाले नाहीत. त्यामुळेचे तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही किंवा तसे कोणते संकेतही मिळालेले नाहीत. 


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारी पाहिली तर यात खुप समानता आहे. यामध्ये लहान मुलं सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. तसेच मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत. कोरोना व्हायरस तोच आहे, त्यामुळे असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, असंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. 


तिसऱ्या लाटेत लहाना मुलांना सर्वाधिक धोका आहे, हा दावा ज्यांनी केला आहे त्याचं म्हणणे आहे की अद्याप मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त झालेला नाही. म्हणूनच तिसऱ्या लाटेत याचा संसर्ग लहान मुलांना जास्त होऊ शकतो. मात्र यापुढे मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, याचे कोणतेही पुरावे नाहीत, असं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं. 






ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य आजार नाही


कोरोनाप्रमाणे ब्लॅक फंगसचा (काळी बुरशी)  एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसार होत नाही. ब्लॅक फंगस हा संसर्गजन्य आजार नाही. मधुमेहग्रस्त लोकांमध्ये ब्लॅग फंगसचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो, अशी माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. ब्लॅक फंगस होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या आजारावर लवकर उपचार केल्यास फायदा होतो. ब्लॅक फंगसची लागण झालेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ बसल्याने हे पसरत नाही, असंही डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.