मुंबई : महाराष्ट्रामध्ये सरकारकडून घातलेल्या निर्बंधाचा फायदा होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.  अशात राज्यातील मृत्यूदर देखील कमी होताना दिसतोय. आज राज्यात 361 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे राज्यातील एकूण 16 शहरं आणि जिल्ह्यात कोरोनामुळं आज जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही. 


या शहरांमध्ये आणि जिल्ह्यात आज एकही मृत्यू नाही
गोंदिया, बुलडाणा, हिंगोली, जालना, धुळे जिल्हा, औरंगाबाद शहर, अकोला शहर, पिंपरी चिंचवड शहर, धुळे शहर, मालेगाव मनपा, वसई विरार शहर, मीरा भायंदर शहर, भिवंडी निजामपूर शहर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे शहरात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. तर भंडारा, नांदेड शहर, लातूर शहर, सोलापूर शहर, औरंगाबाद जिल्हा, नागपूर जिल्हा, जळगाव शहर या क्षेत्रात केवळ एका रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. 


राज्यात 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज 
महाराष्ट्रात आज 42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण 3,24,580  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.   आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 361 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबई, पुण्यातील कोरोनाची आकडेवारी


मुंबईत मागील 24 तासात  1,057 रुग्णांचे निदान झाले आहे. तर  1312 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर गेला आहे. तर पुण्यात अवघ्या 494 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यात आज 1410 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


(या बातमीतील आकडेवारी सरकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकृत प्रेसनोटमधील आहे)