Mumbai Police Recruitment : मुंबई पोलीस भरतीत (Police Recruitment) पुन्हा एकदा गैरप्रकार समोर आला आहे. धावण्याच्या शर्यतीत (Running) जास्त गुण मिळवण्याच्या उद्देशाने चिपची (Chip) अदलाबदल केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 उमेदवारांविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली होती. 


असा झाला गैरप्रकार उघड!


भरती प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक उपकरणांचा वापर करुन डिजिटल पद्धतीने मुंबई पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक होण्यासाठी या तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितलं. तरी देखील मैदानी चाचणीत गैरप्रकार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. धावण्याच्या शर्यतीत वेळ अचूक मोजण्यासाठी पहिल्यांदाच चिपचा वापर केला जात आहे. परंतु काही उमेदवारांनी जास्त गुण मिळवण्याच्या उद्देशाने चिपची अदलाबदल केल्याचं उघड झालं आहे. चिपमधील नोंदवला गेलेला वेळ आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजची पडताळणी केली असता गैरप्रकार उघड झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी उमेदवारांवर गुन्हा दाखल केला आहे. 


मुंबईत 8 हजार जागांसाठी सात लाख उमेदवार रिंगणात


दरम्यान, मुंबई पोलीस दलातील 8070 शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे. आठ हजार जागांसाठी तब्बल सात लाख उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील मरोळ, नायगाव आणि कलिना इथल्या मैदानात उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु आहे. 


पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांकडून अशाप्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार हा पहिला नाही. याआधी काही वर्षांपूर्वी एका उमेदवाराने पोलीस भरती परीक्षेत उंची बसत नाही म्हणून कृत्रिमरित्या केस वाढवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. आता धावण्याच्या शर्यतीत चीप बदलण्याचा प्रकार उघड झाला आहे.


महाराष्ट्रात 18 हजार 331 पदांसाठी पोलीस भरती


महाराष्ट्र पोलीस भरती 2022 (Maharashtra Police Bharti 2022) मध्ये पोलीस शिपाई (Police Constable) पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या (Driver Police Constable) 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई (SRPF Police Constable) पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती.


हेही वाचा


Raigad Police Recruitment : पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना