Raigad Police Recruitment : राज्यातील बहुप्रतीक्षित पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. भरतीसाठी मैदानी चाचणी (Physical Efficiency Test) सुरु आहे. परंतु या मैदानी चाचणी सुरु असतानाच रायगडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड इथे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळली आहेत. या तिन्ही उमेदवारांच्या रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
रायगड इथे पोलीस भरतीसाठी सध्या मैदानी चाचणी सुरु आहे. या चाचणीदरम्यान तीन उमेदवारांकडे उत्तजेक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या.
रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबईला तपासणीसाठी पाठवले
हे तिन्ही उमेदवार पुणे आणि अहमदनगर इथून रायगडमध्ये पोलीस भरतीसाठी आले होते. वरसोली इथल्या कॉटेजमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. या उमेदवारांकडे
न्यूरोकाइंड गोल्ड इंजेक्शन, पाम ओमेगा व्हीआयटी सिई टॅब्लेटस, औषधी द्रव्याच्या तीन काचेच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. तिन्ही उमेदवारांचे रक्ताचे नमुने मुंबई आणि नवी मुंबई इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरती
महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, 2 जानेवारीपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे.
कोणकोणत्या तारखेला शारीरिक चाचणी?
2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा