Pune Mumbai Toll : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना (Pune mumbai old highway) आता डबल झटका बसलाय. कारण पुणे मुंबई द्रुतगती प्रमाणेच आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील टोल मध्ये तब्बल 18 टक्क्यांने वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवे दर लागू होणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. याच मार्गावरील सोमटणे टोल नाका बंद करावा, या मागणीसाठी आमरण उपोषण तर 14 मार्चला मावळवासीय रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी स्वतः आंदोलनस्थळी येत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण उलट 1 एप्रिल 2023 पासून या टोलमध्ये आणखी वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. 

वाहन   जुने   नवे
कार  135  156
हलके वाहन 240    277
ट्रक/बस   476  551
अवजड वाहन 1023 1184

तर स्थानिकांना

वाहन     जुने  नवे
कार   41 47
हलके वाहन   72   83
ट्रक/बस   143  165
अवजड वाहन 307 355

इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. हे दर पुढील तीन वर्षांसाठी असतील आणि 1 एप्रिल 2026 साली पुन्हा यात 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं आहे. खरं तर स्थानिकांची याच जाचक टोल मधून सुटका व्हावी, म्हणून सोमटणे टोल विरोधी कृती समिती संघर्ष केला. 11 मार्चपासून आमरण उपोषण केलं. 14 मार्चला मावळवासीय हा टोल नाका बंद करावा याच मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. तेंव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांनी या टोलचा तोडगा मार्च अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या दरबारात निकाली काढणार आहोत, असं आश्वासन दिलं. तोपर्यंत स्थानिकांची वाहनं विनाटोल सोडण्याच्या सूचना टोल आकारणाऱ्या आयआरबीला देण्यात आल्या होत्या. त्यामुळं आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र हा टोल बंद करणं दूरच उलट यात आणखी वाढ झाली आहे. दुसरीकडे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल महागल्यानं जुन्या पुणे मुंबई माहामार्गाने प्रवास करण्याच्या विचारात असणाऱ्या प्रवाशाना हा डबल झटका बसला आहे.

संंबंधित बातमी-

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास महागणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरांत 1 एप्रिलपासून वाढ, कसे असतील दर?