मुंबई : "जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतं. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु आहे. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं.
घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणं ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआड खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान वर्षा राऊत उद्या चौकशीला जाणार की नाही याबाबत अद्याप ठरवलेलं नाही. ही राजकीय कारवाई आहे. त्यामुळे याविषयी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करुनच निर्णय घेणार आहोत, असंही राऊत यांनी सांगितलं.
ईडी नोटीससंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "गेल्या दीड महिन्यांपासून ईडी आमच्याशी पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती हवी होती. त्यासंदर्भात सर्व कायदपत्रे आम्ही दिली आहे. परंतु या पत्रव्यवहारात कोणत्याही चौकशीचा उल्लेख केलेला नाही. भाजपची पक्षाची माकडं कालपासून उड्या मारतायत की पीएमसी बँक प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. याची माहिती भाजपला कशी काय माहिती आहे? ईडीने भाजपशी हातमिळवणी केली आहे का?
सरकार पाडण्यासाठी धमकी : संजय राऊत
भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठी धमकावलं जात असल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला. याविषयी राऊत म्हणाले की, "भाजपचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक सातत्याने माझी भेट घेऊन हे सरकार टिकवू नका, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी धमकवण्याचा प्रयत्न केला. पणी मी त्यांचा बाप आहे. त्यांनी अनेकांच्या नावाची यादी दाखवली. त्यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगण्यात आलं. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला अटक करा पण या सरकार धक्काही लागू देणार नाही."
Varsha Raut | वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणतात...