मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नोटीसनुसार 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले. हा व्यवहार कसा झाला आणि त्यामागील कारण काय आहे हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.


संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेला प्रतिज्ञापत्रही उल्लेख केला आहे की वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रविण राऊत यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेण्यात आली आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.


विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्यासाठी ईडीचा वापर- नवाब मलिक


ईडीच्या या नोटीसवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक म्हणाले की, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ईडीचा खेळ सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जाते. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या. राजकीय द्वेषामुळे भीती निर्माण करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे.


ईडीचं हे पाऊल अत्यंत निंदनीय- खासदार अरविंद सावंत


ही ईडी आहे की वेडी आहे. ईडीचं हे पाऊल अत्यंत निंदनीय आहे. एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या स्थरावर जातंय कळत नाही. वर्षा राऊत आणि पीएमसी बँकेचा का संबंध आहे. सत्तेसाठी इतके घाणेरणे प्रकार सुरु आहेत. असंच सुरुच राहिल्यास ईडीसारख्या संस्थांना टाळे ठोकावे लागतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं.


संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी करणार