मुंबई : राज्यात फक्त 44 हजार 431 कोविड रुग्णांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या विम्याचा फायदा झाला आहे. सगळ्यात कमी मुंबईतील रुग्णांना या विम्याचा लाभ मिळाला. मुंबईत कोरोनाचे तीन लाख रुग्ण असताना फक्त 1993 रुग्णांना या योजनेचा फायदा झाला. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.


1 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत एकूण 18 लाख, 28 हजार, 826 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 90 हजार रुग्ण अॅक्टिव्ह होते.


सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीच्या अधिकारामार्फत मिळवलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत फक्त 44 हजार 431 रुग्णांना विम्याचा लाभ मिळाला आहे. 1 एप्रिल 2020 पासून ते 3 डिसेंबर 2020 या आठ महिन्याच्या काळामध्ये एकूण 44 हजार 431 रुग्णांचे 110 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. परंतु त्याच काळामधील मंजूर केसेस मध्ये फक्त 30 टक्के म्हणजेच 14 हजार 772 रुग्णांमध्ये एकूण 32.83 कोटी इतकी विम्याची रक्कम संबंधित रुग्ण्यालयाला दिलेली आहे. तसेच पाच हजार 565 कोविड रुग्णांना हा विमा नाकारण्यात आला आहे किंवा प्रलंबित ठेवला आहे


मागील काही काळात सरकारने बरेच मोठे दावे केले होते की या योजनांमध्ये लाखो कोविड-19 रुग्णांना लाभ मिळाला आहे. परंतु या माहितीवरुन स्पष्ट दिसून येते की या योजनेचा फायदा अनेक रुग्णांना मिळू शकलेला नाही


जिल्हानिहाय आकडेवारीनुसार


- पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच 7 हजार 633 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
- ठाणे जिल्ह्यात चार हजार 166 रुग्णांना या योजनेचा फायदा झाला.
- सातारा जिल्ह्यात 2,948 रुग्णांना या योजनेचा विम्याचा लाभ मिळाला
- सगळ्यात कमी मुंबईतील फक्त 1993 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.



सरकारमार्फत अशी घोषणा करण्यात आली होती की, "सगळ्या प्रकारच्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे." परंतु या आकडेवारीनुसार केशरी रेशन कार्ड धारकांना म्हणजेच 32 हजार 662 रुग्णांना याचा लाभ मिळाला तर सहा हजार 362 पिवळ्या रेशन कार्ड आणि चार हजार 952 सफेद रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळालेला आहे.


माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, "या योजनेअंतर्गत 49 हजार 996 कोविड रुग्णांनी या योजनेसाठी अर्ज केला. त्यातील 44 हजार 431 अर्ज मान्य केले मात्र 30 टक्के म्हणजे 14 हजार 772 कोविड रुग्णांना विम्याची रक्कम रुग्णालयांना देण्यात आली.


बरीच रुग्णालये ही योजना राबवण्यात टाळाटाळ करत असून जेव्हा रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करतात तेव्हा त्यांना मदत केली जात नाही आणि रोख पैसे देऊनच उपचार करण्याचे सांगण्यात येते, असे माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी सांगितलं.


तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर मोफत उपचार : सुधाकर शिंदे, सीईओ, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
दरम्यान देशात सर्वाधिक मोफत उपचार महाराष्ट्रात झाल्याची माहिती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सीईओ सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. "महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर मोफत उपचार झाले. त्यापैकी एक लाख रुग्णांचे तपशील अपडेट केले आहेत. जास्तीत जास्त रुग्णांचे तपशील हॉस्पिटलने सबमिट करावेत," असं ते म्हणाले.