मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन राजन निकाळजे उर्फ छोटा राजनला खंडणीच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यायसायिक नंदू वजेकर यांच्याकडून 26 कोटींची खंडणी मागितल्याचं हे प्रकरण होतं. साल 2015 च्या या प्रकरणात छोटा राजनसह सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ 'दाद्या' आणि सुमित म्हात्रे या अन्य तीन जणांनाही दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. तर अन्य एका फरार आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे.


काय आहे प्रकरण?


बांधकाम व्यावसायिक नंदू वजेकर यांनी पुण्यात एक जमीन विकत घेतली होती. या व्यवहारात एजंट म्हणून काम पाहिलेल्या परमानंद ठक्कर याला दोन कोटी कमिशन देण्याचं ठरलं होतं. पण अचानक ठक्कर अधिक पैसे मागू लागला, जे देण्यास वजेकरांनी नकार दिला. त्यानंतर परमानंद ठक्करनं कुख्यात गँगस्टर छोटा राजनही मदत मागितली. त्यानं राजनला सांगितलं की या इसमाकडून बरेच पैसे उकळता येऊ शकतात. तेव्हा राजननं वजेकर यांना धमकावण्यास सुरूवात केली आणि खंडणी म्हणून 26 कोटी रूपयांची मागणी केली. वजेकर यांनी याप्रकरणाची पनवेल पोलीसांत रितसर तक्रार दिली.


एकेदिवशी राजनच्या सांगण्यावरून त्याचे काही गुंड वजेकर यांच्या कार्यालयात त्यांना धमकावण्यासाठी गेले होते. पनवेल पोलिसांनी वझेकर यांच्या ऑफिसमधलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आणि पुढे तपास करत तिथं गेलेल्या राजनच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या. सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ 'दाद्या' आणि सुमित म्हात्रे या अन्य तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधातले देशभरातील सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत.