Mumbai News : मुंबईतील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची पार्किंग लिफ्ट कोसळली आहे. 23 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. परंतु, लिफ्टमध्ये आणखी एक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवम जैस्वाल असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. लिफ्टचा ढाच्या कोसळल्यानंतर जैस्वाल यांना दीड तासांनंतर त्यातून बाहेर काढण्यात आले. परंतु, जैस्वाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 


मिळालेल्या माहितीनुसार,  विक्रोळी येथे  श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीची 23 माळ्यांची इमारत आहे. या सोसायटीच्या पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच पार्किंग लिफ्टचा ढाचा 23 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यावेळी चार कामगार लिफ्टचे काम करत होते. यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. दोघांना बाहेर काढण्यात आले तर आणखी एक कामगार लिफ्टमध्येच आडकल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दल आणि पोलिस पोहोचले आहेत. त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे.  


दरम्यान,  श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीचे बांधकाम हे अनधिकृत करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. परवानगी नसताना इमारतीच्या लिफ्टचे बांधकाम सुरू होते. आम्ही याबाबतचे स्ट्रक्चर देखील मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला याबातची कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याबाबत आम्ही तक्रारी देखील केल्या आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.  त्यामुळे आता पोलिस आणि प्रशासन याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलाय. 


व्हिडीओ



महत्वाच्या बातम्या


Anil Parab : अनिल परब यांना धक्का, ईडीकडून संपत्ती जप्त, साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई