मुंबई : शिवसेना नेते अनिल परब ( Anil Parab ) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. परंतु, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी या कारवाईनंतर म्हटले आहे.  

ईडीने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली होती. शिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते.  

Anil Parab : काय म्हटले आहे अनिल परब यांनी?

दरम्यान, खोटे आकडे सांगून माझी बदनामी करण्यात येत आहे, असा आरोप अनिल परब यांनी केलाय. "या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. परंतु, माझी बदनामी करण्यासाठी यासोबत माझे नाव जोडण्यात आले आहे. ईडीकडून दहा कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, ते कशाच्या आधारावर हा आकडा सांगत आहेत हे मला माहिती नाही. आकडे फूगवून सांगायचे आणि बदनामी करायची हा यामागचा उद्देश आहे. ईडीच्या कारवाई प्रकरणी साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे योग्य ती पावले उचलतील. किरीट सोमय्या हे काही न्यायाधीश नाहीत. त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. अधिकाऱ्यांनी याबाबत मला विचारले तर मी त्यांना उत्तरे देईन. माझ्या बदनामीसाठी मी कोर्टात जाऊन न्याय मागेन. शिवाय या पर्वी देखील मी सोमय्या यांच्या विरोधात कोर्टात आब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याची किंमत सगळ्यांनाच द्यावी लागेल. या प्रकरणी मी आधीच ईडी, पोलिस आणि इनकमटॅक्स विभागाकडे सुलासे झाले आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिलीय.  

महत्वाच्या बातम्या

Mahavitaran Strike : मोठी बातमी! राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा