मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओच्या मूळ मालकाची माहिती समोर
Mukesh Ambani House Antilia Bomb Scare : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्कॉर्पिओच्या मूळ मालकाची माहिती समोर आली आहे. कारमध्ये जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या आहेत.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनचा साठा सापडला आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी अंबानी कुटुंबाला देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या गाडीच्या मूळ मालकाची माहिती समोर आली आहे.
स्कॉर्पिओ गाडीबाबत माहिती.. 17 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन ठाण्यावरून संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईला येत होते. मात्र, विक्रोळी ऐरोली सिग्नल जंकशनजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर त्यांची 2014 ची मॉडेल असलेली स्कॉर्पिओ गाडी बंद पडली. ज्यानंतर मनसुख हिरेन यांनी गाडी तिथेच रस्त्याच्या बाजूला उभी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता हिरेन त्यांची गाडी घेण्यासाठी आले तेव्हा ती गाडी तिथे नव्हती. ज्यानंतर हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती तिथे सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्या रस्त्यावरचे पुढे आणि पाठीमागे असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपला तपास सुरू केला.
Antilia Explosives Scare: मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कार पार्क करुन आरोपी दोन तास आतच बसून होता
पोलीस तपासात समोर आलेल्या माहिती
- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो कार आठवडाभरापूर्वी विक्रोळी येथून चोरीला गेली होती. या गाडीच्या चोरीची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
- गाडीमध्ये काही बनावट नंबर प्लेट्सही आढळल्या आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये एकूण चार नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे.
- याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचं नाव आहे.
- मागील एका महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी केली जात होती, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.
- पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिठ्ठी देखील सापडली आहे. बॅगवर 'मुंबई इंडियन्स' असं लिहिलं आहे. चिठ्ठीत लिहिलं की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.
- परवा (24 फेब्रुवारी) रात्री 1 वाजता ही स्कॉर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर पार्क करण्यात आली होती.
- हीच स्कॉर्पिओ कार त्याच रात्री 12.40 वाजता हाजी अली जंक्शन जवळ असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं आहे. 10 मिनिट ही गाडी तेथे उभी होती.
- गाडी अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये म्हणून चालक गाडीच्या मागच्या दरवाजाने फरार झाला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तैनात केली आहे. सध्या नऊ जणांची चौकशी देखील सुरु आहे.