Bird Flu | ठाण्यात पक्ष्यांवर संक्रांत, आतापर्यंत 353 पक्षी बर्ड फ्लूने दगावले
ठाण्यात मागील पंधरा दिवसात साडेतीनशेहून जास्त पक्षी बर्ड फ्लूमुळे दगावल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 जानेवारीला एकाच दिवशी 35 पक्षी मृतावस्थेत आढळले.

ठाणे : ठाण्यात बर्ड फ्लू हळूहळू हातपाय पसरत आहे. गेल्या पंधरा दिवसात ठाण्यात साडेतीनशेहून जास्त पक्षी बर्ड फ्लूमुळे दगावले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे. केवळ शुक्रवारी (15 जानेवारी) एका दिवशी 35 पक्षी मृत आढळले आहेत. यामध्ये सर्वात मृत्यू हे कावळा प्रजातीचे झाले आहेत. यामुळे ठाण्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय वाटिका सोसायटीजवळ 4 पाणबगळे आणि 2 पोपट मृत आढळले होते. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने पाणबगळ्यांचे मृतदेह हे पुण्याच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्यानंतर, काही बगळे हे बर्ड फ्लूने दगावल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने पालिकेतच बर्ड फ्लू नियंत्रक कक्ष स्थापन करुन नागरिकांनी पक्षी मृत सापडल्यास पालिकेला कळवावे असे जाहीर आवाहन केले आणि मृत पक्ष्यांच्या आकड्यात कमालीची वाढ झालेली दिसून आली.
ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यात आतापर्यंत तब्बल 353 पक्षी बर्ड फ्ल्यूमुळे मृत पावलेले आहेत. त्यात शुक्रवारी एकाच दिवशी 35 पक्षी मृत पावल्याने ठाण्यात चिंतेचे वातावरण आहे. ठाण्यात आतापर्यंत मृत पावलेल्या पक्ष्यांमध्ये कावळे-143, कबुतरे-36, बदक-1, कोकीळ-1, गिधाड-1, पोपट-4, कोंबडी -134, पाणकोंबडी-1, बगळे-4, पाणबगळे-21 अशा 353 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात पाहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावलेले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात ठाण्यात फैलावतोय हे स्पष्ट झाले आहे. मृत पावलेल्या पक्षांमध्ये सर्वपक्षीय मुक्त संचार करणारे पक्षी असल्याने पाळीव पक्ष्यांमध्ये अजून या रोगाचे संक्रमण झालं नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे घरात पाळीव पक्षी बाळगणाऱ्या नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन पालिकेने केले आहे.
दरम्यान निंभोरा येथील तंवरनगर भागात 130 मृत कोंबड्या कचरापेटीमध्ये फेकल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मेल्या असल्याचे अंदाज पालिकेने व्यक्त केला आहे. मात्र या कोणत्या दुकानातील होत्या आणि त्या कुणी फेकल्या याचा शोध आता पालिका आणि पोलीस प्रशासन घेत आहे.
























