Aarey Colony: बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आरे कॉलनीतील घटना
Aarey Leopard Attack: मुंबईतील आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
![Aarey Colony: बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आरे कॉलनीतील घटना one year old girl died in leopard attack in aarey colony mumbai Aarey Colony: बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आरे कॉलनीतील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/24/eb92590a73aa3fe4200deaffd530ca9d1666599880492290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aarey Leopard Attack: मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत (Aarey Colony) बिबट्याने (Leopard Attack) केलेल्या हल्ल्यात एका दीड वर्षाच्या मुलीला प्राण गमवावे लागले आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबांवर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. इतिका लोट असे या दुर्देवी दीड वर्षीय मुलीचे नाव आहे.
आरे कॉलनीमधील युनिट क्रमांक 15 मध्ये ही घटना घडली. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाची मुलगी आईसह दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आली होती. दिवे लावल्यानंतर घरामध्ये जात असताना मागून बिबट्याने दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी आई घरात होती, अशी माहिती समजते. घराबाहेर असणारी इतिका घरात न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात आढळला. बिबट्याच्या हल्ल्यात तिचा दुर्देवी मृत्यू झाला. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळी मुलीवर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेने परिसरात भीतीचे वातावरण होते. आरे कॉलनीमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. बिबट्यांचा हा नैसर्गिक अधिवास असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येते. मुंबई मेट्रो-3 च्या कारशेड काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचे नैसर्गिक अधिवास असलेले ठिकाण असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येतो. या आणि इतर मुद्यांवर पर्यावरणप्रेमींकडून आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करण्यात येत होता. आरे ऐवजी इतरत्र कारशेड उभारण्याची मागणी करण्यात येत होती. आरे कॉलनीचा भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. आरेच्या जंगलात जैवविविधता आहे.
आरे कॉलनीत याआधीदेखील बिबट्याने हल्ले केले आहेत. मागील काही वर्षात आरे कॉलनीत बांधकाम, अतिक्रमण वाढल्याने जंगलाचा भाग कमी झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. आरेत पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने बिबट्याचा अधिवास आणि मानवी वस्ती या मुद्यावर पुन्हा चर्चा झडण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)