माझा कट्टा | नागपूरचे 'ऑक्सिजन मॅन' प्यारे खान... रिक्षा चालवली, संत्री विकली; आज समाजासाठी करतायेत कोट्यवधींचा खर्च
प्यारे खान यांनी कोरोना काळात विदर्भासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे ठरवले. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने सध्या विदर्भात 19 टंँकर्सच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा सुरु असल्याची माहिती प्यारे खान यांनी दिली.
मुंबई : सध्या कोरोनाच्या संकटात अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या कामातून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना संकटात कसलीही तमा न बाळगता नागपूरच्या प्यारे खान यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. नागपूरमधील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्यारे खान यांनी आतापर्यंत तब्बल 85 लाख रुपये खर्च केले आहे. असे मोठ्या मनाचे प्यारे खान आज एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. एक दहावी नापास रिक्षाचालक ते 400 कोटींची उलाढाल असलेले व्यावसायिक त्यांचा हा यशस्वी प्रवासही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना प्यारे खान यांना सांगितलं की, कोरोना काळात मी सतत न्यूज चॅनेल पाहत होतो. त्यावेळी प्रशासनाला देखील मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे हे दिसून येत होतं. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरी यांनी बड्या व्यावसायिकांना पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं. त्यावेळी नितीन गडकरी यांच्या आवाहनानंतर मी पुढे येऊन आपणही काहीतरी मदत करावी हे ठरवलं आणि नितीन गडकरी यांना भेटलो. कोरोना रुग्णांसाठी त्यावेळी ऑक्सिजनही सर्वात अधिक गरज भासत होती. ऑक्सिजन तर कमी होतंच तसेच ऑक्सिजन टँकर्सची कमतरता असल्याचं समजलं. त्यामुळे विविध ठिकाणाहून टँकर्सची सोय केली आणि त्या माध्यमातून विदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु केला. सद्यस्थितीला आमच्याकडे 19 टँकर्स आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांनी माझ्यावर विदर्भात ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली, अशी माहिती प्यारे खान यांनी दिली.
आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय कोविड काळात जवळपास बंद आहे. व्यवसायात नफा-तोडा सुरु असतो. मात्र सध्या नागरिकांची मदत करणे गरजेचं आहे. त्यानुसार आम्ही कोरोना संकटात लोकांची मदत करण्यास प्राधान्य दिलं. त्यानुसार नागपूरला किती ऑक्सिजन लागतं याची माहिती प्रशासनने दिली. सध्या नागपूरला 130 टन ऑक्सिजनची गरज दिवसाला लागते. म्हणजेच सहा-सात टँकरमध्ये नागपूरची गरज पूर्ण होते. त्यानंतर संपूर्ण विदर्भात ऑक्सिजन पुरवठा करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली. त्यांनंतर हळूहळू एक एक जिल्हा वाढत आम्ही संपूर्ण विदर्भाला आज ऑक्सिजन पुरवठा करत आहोत. 24 तास एक टीम या कामासाठी तैनात आहे, असं प्यारे खान यांनी सांगितलं.
रिक्षाचालक ते 400 कोटीचा व्यवसाय
प्यारे खान यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रान्सपोर्ट कंपनी आहेत, तसेच त्यांचे 2 पेट्रोल पंप देखील आहे. पंरतु त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. याधी त्यांना रेल्वे स्टेशनबाहेर संत्री विकली, त्यानंतर काही काळ रिक्षा चालवली, खासगी कंपनीत काम कामगार म्हणून काम केले. मात्र व्यवसाय करण्याची जिद्द मनात असल्याने त्यांनी प्रथम बँक लोन काढून पहिला ट्रक विकत घेतला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रगतीला कधी ब्रेक लागला नाही. अशारीतीने त्यांनी शुन्यातून 400 कोटीपर्यंतची मजल मारली.
बिझनेस मॉडेलचा IIM अहमदाबादकडून अभ्यास
IIM अहमदाबादचा किस्सा सांगताना प्यारे खान यांनी सांगितलं की, IIM अहमदाबादमधून एकदिवस फोन आला. त्यावेळी त्यांना मी विचारल की IIM काय आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे. कारण 100 कोटींच्या पुढील व्यवसायासाठी प्रॉपर मॅनेजमेंट लागतं. त्यामुळे आमचा व्यवसाय नेमका कसा मॅनेज केला जातो याची माहिती त्यांना हवी होती. त्यावेळी IIM अहमदाबादची एक टीम येथे आली आणि शहानिशा केली. त्यानंतर मला अहमदाबाद येथे बोलावलं. देशातील 20 जणांची तेथे निवड झाली होती. यामध्ये टप्प्याटप्याने 12, 8, 4 असे सिलेक्शन होऊन शेवटी मी विजेता ठरलो होतो.