कल्याणमध्ये वृद्ध दाम्पत्याला 4 लाखांना गंडा, पैसे मागितल्यास दहशतवादी म्हणून अडकवण्याची धमकी
झेबूर हे मागील अनेक वर्ष आखाती देशात नोकरी करत होते. मात्र ते काही महिन्यांपूर्वी कायमचे भारतात परतले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अक्रम कुरेशी यांना अटक केली असून त्याचा साथीदार आदेश सिंग आणि दोन बोगस पोलिसांचा शोध सुरू आहे.
कल्याण : एका वृद्ध दाम्पत्याला चार लाखांचा गंडा घालून वर पैसे परत मागितले, तर काश्मिरी आतंकवादी म्हणून अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे.
कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या परवीन सय्यद आणि त्यांचे पती झेबूर सय्यद यांच्यासोबत हा प्रकार घडला. झेबूर हे मागील अनेक वर्ष आखाती देशात नोकरी करत होते. मात्र ते काही महिन्यांपूर्वी कायमचे भारतात परतले आहेत. या दाम्पत्याला 5 मुले असून त्यापैकी दोन मुले सध्या इंजिनिअरिंग करत आहेत. त्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी जमापुंजीतून एखादी गाडी घेऊन ओलाला लावण्याची कल्पना परवीन यांना सुचली.
त्यानुसार त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणारा अक्रम कुरेशी आणि त्याचा मित्र आदेश सिंग यांना त्यांनी कार घेण्यासाठी 4 लाख रुपये दिले. मात्र दोन महिने उलटूनही या दोघांनी त्यांना कार घेऊन न दिल्यामुळे परवीन यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागायला सुरुवात केली. यानंतर अक्रम हा परवीन यांचे पती झेबुर यांना घेऊन ठाण्याला गेला आणि तिथे दोन बोगस पोलिसांच्या साहाय्याने त्यांना धमकी दिली.
पैसे परत मागितले, तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला काश्मिरी आतंकवादी असल्याचं सांगून अडकवू, अशी धमकी झेबुर यांना देण्यात आली. यानंतर अखेर परवीन यांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अक्रम कुरेशी यांना अटक केली असून त्याचा साथीदार आदेश सिंग आणि दोन बोगस पोलिसांचा शोध सुरू आहे.