(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रुंदीकरण आणि मेट्रोकामासाठी 700 पेक्षा अधिक झाडांवर नोटीस, 700 पेक्षा अधिक झाडांवर कुऱ्हाड?
रोजची ट्राफिक जॅमची समस्या लक्षात घेता रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू असताना अडथळे ठरत असलेल्या या झाडांवर मात्र वृक्षप्राधिकरण विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर नोटीस लावल्या आहेत.
मुंबई : एकीकडे आरेमध्ये पर्यावरणाचा विचार करत आरे कारशेड कांजूरमार्गला हलवणारे ठाकरे सरकार जेव्हीएलआर रुंदीकरण आणि मेट्रो कामासाठी 700 पेक्षा अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवणार का? असा प्रश्न समोर आलाय. याचे कारण म्हणजे जेव्हीएलआर रोडवरील रुंदीकरण सुरू असताना त्यामध्ये अडथळा म्हणून येणाऱ्या झाडांवर वृक्ष प्राधिकरण विभागाने हरकती मागवून सुद्धा नोटीस चिटकवल्या आहेत. मात्र, या वृक्षतोडीच्या प्रस्तावाला त्या ठिकणच्या स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड भागात मेट्रो-6 लाइनचा काम एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे बीएमसी अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणचा काम. यामध्ये रोजची ट्राफिक जॅमची समस्या लक्षात घेता रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू असताना अडथळे ठरत असलेल्या या झाडांवर मात्र वृक्षप्राधिकरण विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर नोटीस लावल्या आहेत. यामध्ये बीएमसीकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून यामध्ये 728 झाडांवर कुऱ्हाड चालावली जाणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहेत.
या प्रस्तावाबाबत बीएमसीसोबत वृक्षप्राधिकरण अधिकारी यांच्याकडे सुद्धा एबीपी माझाने माहिती विचारली असता त्यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव सादर झाला असल्याच सांगितलं आहे. यामध्ये संपूर्ण या कामामध्ये 994 झाडं अडथळे म्हणून येत असून जेव्हिएलआर रोडवर 728 झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागणार असल्याच सांगितलं. त्यापैकी 128 झाडं पूर्णपणे तोडली जाणार असून 610 झाड पुनर्रोपित केली जाणार आहेत. मात्र, याबाबत लोकांच्या हरकती मागवून यावर विचार केला जाणार असल्याचं वृक्षप्राधिकरणकडून सांगण्यात आलाय. परंतु, मागील काही दिवसात या वृक्षतोडीच्या विरोध दर्शवत याबाबत हरकती पाठवून सुद्धा नोटीस लावल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.
'आरे कारशेडला पर्यावरणाचा विषय समोर ठेवून ठाकरे सरकारने विरोध करत कारशेड कांजूरमार्ग हलवले. तिथे वृक्षतोड होते तशी येथे सुद्धा वृक्षतोड होत असताना विकास कामांमध्ये सरकारची अशी दुटप्पी भुमीका का ? मग या विकास कामासाठी स्थानिक, पर्यावरणवादी विरोध करत असताना ठाकरे सरकारने त्यांची बाजू घेऊन पर्यायी मार्ग काढावा' अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाला बोलताना दिली. त्यामुळे यावर वृक्षप्राधिकरण आणि राज्य सरकार काय निर्णय घेत ? यावर काय पर्यायी मार्ग काढला जातो हे बघावं लागणार आहे.