एक्स्प्लोर
मालेगाव बॉम्बस्फोट : सहा महिन्यांत केवळ 14 जणांची साक्ष; हायकोर्टाचे NIA ला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या सहा महिन्यांत केवळ 14 जणांची साक्ष नोंदवली असून 475 पैकी 300 हून अधिक साक्षीदार बाकी आहेत. यासंदर्भात एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
मुंबई : साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची सुनावणी अतिशय संथ गतीनं का सुरू आहे?, तसेच डिसेंबर 2020 पर्यंत खटला कसा निकाली काढणार?, याबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जारी केले आहेत. गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिलेले आहेत. त्यावर उत्तर देताना गेल्यावर्षी एनआयएनं हायकोर्टाला आश्वासन दिलं होतं की डिसेंबक 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे.
या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत, ज्यातील 300 हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे. यावरून दिलेल्या निर्देशांनुसार या खटल्यात फारशी प्रगती दिसत नसल्याचं सध्यातरी दिसतंय, असं स्पष्ट करत हायकोर्टानं एनआयएला या विलंबाचं कारण स्पष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. 16 मार्चला हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नीतीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे मालेगाव ब्लास्ट संदर्भातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली.
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : माझ्या विरोधातील आरोपपत्र अवैध, आरोपी प्रसाद पुरोहितांचा हायकोर्टात दावा
खटल्याला जाणून बुजून विलंब केला जातोय -
अनेकदा खटल्याच्या सुनावणीला काही वकीलच हजर राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जातोय, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांच्यावतीने हायकोर्टात करण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टाने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी करत सध्या जामीनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केली आहे. जर काही कारणांमुळे या खटल्यास विलंब होत असेल तर त्यांची कारणं आणि संबंधित व्यक्तींची नावं सीलबंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देशही याआधी हायकोर्टानं एनआयएला दिले होते. त्यानुसार एनआयएकडून हायकोर्टाच्या खंडपीठासमोर अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालानुसार या खटल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रशमदर्शनी हायकोर्टाच्या निदर्शनास आले. याची दखल घेत पुढील सुनावणीवेळी एनआयएला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेवटची संधी देत 16 मार्चपर्यंत ही सुनावणी तहकूब केली. 29 सप्टेंबर 2008 ला मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांना अटक करून त्यांच्यावर एनआयए विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील काही संशयित आरोप अद्याप फरार असून वरील सर्व आरोपी जामीनवर आहेत.
Nirbhaya Rapist Death Sentence | दिल्ली निर्भया बलात्काराप्रकरणी चारही दोषींना एकत्र फाशी देणार - दिल्ली हायकोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement