मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावत राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुढील चौकशीसाठी नवलखा यांची आणखी 10 दिवसांची कोठडीही मंजूर केली.


या खटल्यातील आरोपी व मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएकडून आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावामुळे खटल्याबाबत अधिक तपास करता आला नाही. अटकेपासून 90 दिवसांच्या कालावधीत एनआयए आरोपपत्र दाखल करण्यास अपयशी ठरल्यामुळे जामीनासाठी नवलखा यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जांवर एनआयए विशेष न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी पार पडली.


एनआयएला का मिळाली 90 दिवसांची मुदतवाढ
बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (युएपीए) गुन्हांची नोंद केली असल्याने तपासयंत्रणेला चौकशी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो. मात्र, 90 दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाढीव 90 दिवसांच्या अवधीसाठी तपास यंत्रणेला तपासातील प्रगती अहवाल द्यावा लागतो. दुसरीकडे नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलेला कालावधी 90 दिवसांच्या मुदतीतही गणण्यात यावा असा युक्तिवाद नवलखा यांच्यावतीने करण्यात आला होता. मात्र, घरात नजरकैद असतानाचा कालावधी अटकेच्या कालावधीत समाविष्ट करता येणार नाही; तसेच नजर कैदेदरम्यान नवलखा यांना कधीही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत 22 जुलैपर्यंत तळोजा कारागृहात नवलखा यांचा ताबा एनआयएकडे सोपविण्याचे निर्देश दिले. तेलतुंबडे आणि नवलखा यांच्याविरोधात चौकशी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला 90 दिवसांची मुदतवाढ देत सुनावणी तहकूब केली.


कोरोना पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांचा जामीनासाठी अर्ज


वरवरा राव यांची हायकोर्टात धाव
तर दुसरीकडे एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव इथं उसळलेल्या हिसांचार प्रकरणी अटकेत असलेले लेखक, कवी वरवरा राव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी राव यांनी या याचिकेतून केली आहे.


31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी, 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी थेट संबंध आहे, असा पोलिसांचा आरोप आहे.


राव हे सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. तळोजा कारागृहात प्रकृती खालावत चालली असल्याचे राव यांनी स्वतःहून फोनद्वारे आपल्या नातेवाईक आणि वकिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली. जेजे रुग्णालय प्रशासनाने सुचविल्याप्रमाणे कारागृह प्रशासन राव यांच्यावर योग्य ते उपचार करत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. कारागृहातील ज्या अधिकाऱ्यांनी हा गलथानपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी, राव यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांना उपचारांसाठी खासगी तातडीनं रुग्णालयात दखल करावं अशी मागणीही याचिकेमार्फत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


Bogus Soybean Seeds | बोगस बियाणे प्रकरण | डॉ. जाधव 13 जुलैला हजर न राहिल्यास त्यांना अटकेचे आदेश