मुंबई : शहरातील भायखळा महिला कारागृहातील कैद्यांची सद्यस्थिती आणि कोरोना बाबतची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने जेल प्रशासन आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले आहेत. भीमा कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टानं हे निर्देश दिले आहेत.
एल्गार परिषदेचा भीमा कोरोगाव प्रकरणी संबंध जोडत पोलिसांनी मजदूर संघाच्या नेत्या आणि विचारवंत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सुधा भारद्वाज या सध्या मुंबईतील भायखळा महिला कारागृहात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाला इथं धोका असल्याचा दावा करत भारद्वाज यांनी 29 मे रोजी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात अंतरिम जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्या आदेशाविरोधात भारद्वाज यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
58 वर्षीय भारद्वाज यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे दोन गंभीर स्वरूपाचे आजार असून जेलमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता त्यांना इथं संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. असा युक्तिवाद त्यांच्यावतीनं अॅड. युग चौधरी यांनी हायकोर्टात केला. मात्र, तपासयंत्रणेनं त्याला विरोध केला आहे. भारद्वाज यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल डॉक्टरांचा अहवाल आणि भायखळा कारागृहातील कैद्यांना उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांचा अहवाल यावेळी एनआयए कोर्टात सादर केल्यानंतरच भारद्वाज यांचा अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत तुरूंगातील सद्य स्थिती आणि कोविड 19 बाबत दक्षता घेण्याबाबतचा ताजा अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासन आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला देत खंडपीठाने सुनावणी 17 जुलै पर्यंत तहकूब केली.
Thane Lockdown Extended | ठाण्यात लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला! आता 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन