मुंबई : मुंबईकरांसाठी कोरोनाबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी. पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज पडतेय. मात्र, या शहरांच्या तुलनेत मुंबई कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णणसंख्या असलेल्या मुंबईत रुग्णणसंख्या दुपटीचा कालावधीनं पन्नाशी गाठली आहे.


मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर, तर मुंबईतला रुग्णणवाढीचा वेगही मंदावला आहे.


ठाण्यात रुग्णणवाढीचा वेग 3.2% आहे तर रुग्णदुपटीचा कालावधीही केवळ 25.13 दिवसांचा आहे.


पुण्यात रुग्णदुपटीचा कालावधी 19.7 दिवस आहे तर रुग्णावाढीचा वेग 4 टक्के. पुणे आणि ठाणे शहरांच्या तुलनेत मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे.


11 मार्च 2020 ला मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. आणि बघता बघता अख्ख्या मुंबईत कोरोनानं आपले हातपाय पसरले. जशी कोरोनाची एन्ट्री मुंबईतल्या झोपडपट्ट्टयांमध्ये झाली, तशी मुंबईची चिंता आणखीनच गडद झाली. पण, संकट कोणतंही येऊ दे हार मानेल ती मुंबई कसली. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कामगार, पोलीस यंत्रणा, पालिका प्रशासन या साखळीनं अखेर कोरोनाच्या साखळीला सुरुंग लावलाच.


आज मुंबईत राज्यातील सर्वात जास्त रुग्ण असले तरी मुंबई नियंत्रणात कशी असा प्रश्न तुम्हांला पडला असेल. मात्र, "मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांपेक्षा कोरोनाबाबत नियंत्रणात आहे, इथे पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही" असं आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितलंय. याचं मुख्य कारण म्हहणजे मुंबई महापालिकेनं रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचं 'अर्धशतक' गाठलंय. तर, रुग्ण वाढीचा वेगही मंदावलाय.


रुग्ण दुपटीचा दर म्हणजे काय?


कोरोना या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्यास लागणारे 'दिवस' म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. 22 मार्च 2020 ला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा केवळ 3 दिवस होता. 15 एप्रिलला 5 दिवस, हळहळु वाढत 16 जूनला रोजी 30 दिवसांवर गेला तर 10 जुलै 2020 रोजी दिवस अखेरीस हा कालावधी तब्बल 50 दिवसांवर पोहचला आहे. हाच वेग मुंबई, वांद्रे पूर्व - खार पूर्व - सांताक्रूज पूर्व इत्यादी परिसरांचा समावेश असलेल्या 'एच पूर्व' विभागात 134 दिवस एवढा झाला आहे.


"फोर टी" कोरोनाला मात देणारी चतु:सुत्री


चेस द वायरस आणि 'ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग' ची चतु:सूत्री महापालिकेनं वापरली. आणि हा फॉर्म्युला धारावीसारख्या ठिकाणी देखील यशस्वी ठरला. तसंच, नव्यानं तयार झालेल्या उत्तर मुंबईतही पालिकेनं मिशन झिरोची सुरुवात केली आहे.


मुंबईत रुग्णसंख्या वाढायला लागली, तेव्हा कोरोना बाधित मुंबईकरांना रुग्णखाटा मिळण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्ररणा असणं आवश्ययक होतं. सुरुवातीच्या काळात बेडस् मिळवताना जी धांदल उडायची त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं Standard Operating Procedure/SOP तयार केली. यात खाजगी लॅबकडून कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासांच्या आत महापालिकेकडे देणं बंधनकारक केलं. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण केलं. पालिकेच्या वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णांना औषधोपचार मिळवून दिले.


Lockdown Extension | राज्यात ´लॉकडाऊन´च्या साथीचा आजार!


डबलींग रेट 50 दिवसांवर गेला असला तरी लढाई संपली असं नाही. ज्या भागांमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम (Rapid Action Plan) नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रामुख्याने 50 फिरते क्लिनिक (मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन) विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करुन बाधितांचा शोध घेत आहेत. पुढचे 2-3 आठवडे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


महाराष्ट्रासमोरचं आव्हान मात्र कायम
कोरोनानं प्रशासकिय यंत्रणेला एक महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे कोणत्याही संकटकाळात केवळ कागदावरचं योग्य नियोजन करुन भागत नाही. त्याची तत्परतेनं अंमलबजावणी होणं आणि इतर यंत्रणांनी सहकार्य करणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच मुंबईत प्रशासनाच्या प्रयत्नांना पोलिसांच्या कठोर शिस्तीचीही साथ मिळाली. लॉकडाऊनचे नियम मुंबईसारख्या शहरांत पाळले जाणं कितीतरी अवघड आहे, पण हे आव्हान पोलिसांनी आणि मुंबईकरांनी सकारात्मकतेनं पेललं. आज ठाणे-पुणे आणि मुंबई या त्रिकोणाच्या तीन कोनांपैकी मुंबई कोरोनामुक्तीच्या दिशेनं निघाली असली तरी ठाणे, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोरचं आव्हान मात्र कायम आहे.


Mumbai Corona Update | मुंबईत परिस्थिती नियंत्रणात, 100 टक्के लॉकडाऊनची गरज नाही : इक्बाल सिंह चहल