मुंबई : मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर गेला आहे. यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या माहितीनुसार, सर्वात आधी प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहिमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबीरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्याआधारे उपचारांवर भर देणे, अशा उपाययोजनांनी कोविड 19 चा संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असं आयुक्तांनी सांगितलं.


महानगरपालिका प्रशासनाने 22 जून 2020 रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवस होता. हा कालावधी 2 ते 3 आठवड्यांत 50 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. तसेच त्यादृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या आराखड्याची माहितीदेखील दिली होती.


कोरोना रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1 जुलै रोजी 40 दिवसांवर पोहोचला. तर आज हा कालावधी 51 दिवसांचा आहे. मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर 1 जुलै रोजी 1.68 टक्के होता. हा दर काल (12 जुलै) 1.36 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. एका बाजूला रुग्णसंख्या नियंत्रणात आणणे, त्यांना वेळीच शोधणे यावर जोर दिला जात असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. 22 जून मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे 50 टक्के होते. 1 जुलै रोजी हे प्रमाण 57 टक्के झाले. तर दिनांक 12 जुलै रोजी हा दर 70 टक्के झाला आहे.


मुंबईत कोरोना नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : मुंबई महापालिका आयुक्त


आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोविड 19 बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्या (बेड) रिकाम्या असण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत विविध समर्पित कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून 22 हजार 756 रुग्णशय्या उपलब्ध आहेत. यापैकी 10 हजार 130 बेड रिकामे आहेत. साहजिकच रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची तक्रार आता निकालात निघाल्या सारखीच आहेत.


महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच विभागीय नियंत्रण कक्षच्या (वॉर्ड वॉर रुम) माध्यमातून रुग्णशय्यांचे व्यवस्थापन होऊ लागल्याने त्यामध्ये सुसूत्रता आली.


दरम्यान, महानगरपालिकेकडून होणाऱ्या कोविड चाचण्यांची दैनंदिन क्षमता पूर्वीच्या सरासरी 4 हजार वरुन आता 6 हजारापर्यंत वाढली आहे. डॉक्टरांच्या लिखित प्रपत्राशिवायदेखील चाचणी करुन घेण्याची मुभा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर आहे. चाचण्यांची संख्या वाढावी, अधिकाधिक रुग्ण शोधता यावे, यासाठी महानगरपालिकेने आपल्या धोरणामध्ये सुसंगतता आणली. त्यामुळे चाचण्या वाढल्या. असं असलं तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम म्हणून बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वीच्या 1400 वरुन आता 1200 पर्यंत खाली आले आहे. यातही लक्षणे नसलेल्या बाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण सुमारे 80 टक्के आहे. ही सर्व स्थिती समाधानकारक आहे.


Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद, नानावटी रुग्णालयाची माहिती