मुंबई : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. साध्वीच्या जामीनाला आव्हान देत तिला लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. एखाद्या आरोपीला निवडणूक लढण्यापासून रोखणं हा निर्णय कोर्टाच्या अखत्यारीत नाही, याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा. नासिर बिलाल यांची ही याचिका कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नाही, असं मत नोंदवत न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.


याचिकाकर्त्यांना कोणताही आर्थिक दंड न आकारता निव्वळ समज देण्यात आली आहे. मात्र तपासयंत्रणा एनआयएला कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. "आम्ही साध्वीला क्लीन चीट दिलेली आहे, हे तुमच्या उत्तरात लिहायची काय गरज होती? यावर याचिकाकर्त्यांनी सवाल केलेला नव्हता. तसंच कोर्टाला आरोपांत काहीतरी तथ्य वाटलं म्हणूनच साध्वीवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत, हे लक्षात ठेवा," असं कोर्टाने म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर असा सामना पाहायला मिळणार आहे.

VIDEO | साध्वी प्रज्ञाला एनआयए कोर्टाचा दिलासा, निवडणूक लढवण्याविरोधातील याचिका फेटाळली | एबीपी माझा



साध्वी प्रज्ञा आणि एनआयएचं उत्तर

"ही याचिका निव्वळ राजकीय हेतून प्रेरीत आहे. याचिकेतील मागणी आणि आरोपांत कोणतही तथ्य नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना मोठा आर्थिक दंड आकारावा, जेणेकरुन कोर्टाचा वेळ खाणाऱ्या अशा याचिका दाखल होणार नाहीत," असं उत्तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने एनआयए कोर्टात सादर केलं होतं. तर साध्वी प्रज्ञा यांनी निवडणूक लढवावी की लढू नये, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. हा निर्णय आमच्या अखत्यारीत येत नाही असं उत्तर राष्ट्रीय तपासयंत्रणेनं कोर्टात दिलं होतं. तसंही याआधीच आम्ही या प्रकरणांत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना 'क्लीन चीट' दिलेली आहे, आम्ही त्यावर आजही ठाम आहोत, असं एनआयएनं कोर्टाला दिलेल्या आपल्या उत्तरात म्हटलं होतं.

साल 2008 च्या मालेगाव ब्लास्टमध्ये मुलगा गमावलेल्या नासिर बिलाल यांनी एनआयए कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने साध्वी आणि तपासयंत्रणेला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी या दोघांनी आपलं उत्तर कोर्टापुढे सादर केलं. ज्यावर बुधवारी (24 एप्रिल) सुनावणी घेत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

VIDEO | साध्वी प्रज्ञा सिंहांच्या वक्तव्यावर शहीद हेमंत करकरे यांच्या कुटुंबाला काय वाटतं? | मुंबई | एबीपी माझा



संबंधित बातम्या

लोकसभा उमेदवारीविरोधातील याचिकेवर प्रज्ञा सिंह आणि एनआयएचं कोर्टात उत्तर

साध्वी प्रज्ञा सिंहच्या लोकसभा उमेदवारीविरोधात एनआयए कोर्टात याचिका