मुंबई : ऐन गर्दीच्या वेळेला हार्बर लाईनवर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळेसच लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत. हार्बर रेल्वेवर बुधवारी सकाळी मानखुर्द स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली.  रेल्वेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीचे काम सुरु देखील झाले आहे.

यामुळे मानखुर्द – पनवेल या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका पनवेलकडून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांनाही बसत आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्याही रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

 मानखुर्द येथे लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफला ओव्हरहेड वायर अडकल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. यामुळे सकाळपासून पनवेलकडे जाणारी वाहतूक बंद पडली.  साधारणतः दीड तास लोकल सेवा बाधीत झाली. याचा परिणाम अप आणि डाऊन अशा दोन्ही वाहिन्यांवर झाल्याने हार्बर मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस हा बिघाड झाल्याने चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.