मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट, एनसीबीचे समीर वानखेडे यांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र
Sameer Wankhede Letter To Mumbai CP: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
Sameer Wankhede Letter To Mumbai CP: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. समीर वानखेडे यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे, जेव्हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावी याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रभाकर साईलचा दावा
मुख्य साक्षीदार असलेला पी गोसावीच्या अंगरक्षकाने या प्रकरणात मोठा खुलासा केल्याने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा पेपर असल्याचे सांगत कोऱ्या कागदावर बळजबरीने स्वाक्षरी घेतल्याचे बॉडीगार्ड प्रभाकरने नोटरीकृत प्रतिज्ञापत्रात सांगितले. वास्तविक क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेबद्दल त्याला जास्त माहिती नव्हती. प्रभाकर हे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात केपी गोसावींव्यतिरिक्त आणखी एक साक्षीदार आहेत.
प्रभाकरने सांगितले की, तो किरण गोसावीचा खाजगी अंगरक्षक म्हणून काम करतो. क्रूझ पार्टीच्या छाप्यावेळी ते गोसावी यांच्यासोबत होते. या घटनेनंतर किरण गोसावी रहस्यमयपणे गायब झाल्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे, असे प्रभाकरने सांगितलंय.
प्रभाकरने आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, तो एनसीबी कार्यालयाबाहेर सॅम डिसूझाला भेटला. त्यावेळी ते के.पी.गोसावींना भेटायला आले होते. लोअर परळ जवळील बिग बाजार जवळ NCB कार्यालयातून दोघेही आपापल्या कारमध्ये पोहोचले. त्याने शपथपत्रात दावा केलाय की गोसावी हे सॅम नावाच्या व्यक्तीशी 25 कोटी रुपयांनी सुरुवात करुन 18 कोटींमध्ये फिक्स करण्यासाठी बोलत होते. ते समीर वानखेडे यांना 8 कोटी रुपये देण्याबाबतही बोलले आहे.
यानंतर निळ्या रंगाची मर्सिडीज कार लोअर परेलला पोहोचते ज्यात शाहरुख खानची सेक्रेटरी पूजा ददलानी होती. कारमध्ये केपी गोसावी आणि सॅम यांची पूजा ददलानीसोबत भेट झाली.
15 मिनिटांनी तिथून मंत्रालयाच्या दिशेने निघालो. पी.गोसावी कोणाशी तरी फोनवर बोलतात आणि तेथून वाशीच्या दिशेने निघून जातात, वाशीला पोहोचल्यानंतर गोसावी यांनी मला सांगितले की तू इनोव्हा गाडीने ताडदेवला जा, एखाद्या व्यक्तीकडून 50 लाख रुपये रोख घे, मी पैसे घेतले आणि वाशीला पोहोचल्यानंतर त्याने ती बॅग किरण गोसावीला दिली.
नवाब मलिक यांची एसआयटी चौकशीची मागणी
आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावीचा अंगरक्षक प्रभाकर साईलच्या खुलाश्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी याची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केली जात होती. चौकशी झाली तर अनेक मोठे खुलासे होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.
नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीच्या साक्षीदाराने ज्या प्रकारे खुलासा केलाय तो गंभीर आहे. समीर वानखेडे या विभागात आल्यापासून त्यांनी चित्रपट उद्योगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले. करोडो रुपये वसूल करण्याचे काम केले जात होते.