योगी आदित्यनाथांनी लक्षात ठेवावं, बॉलिवूड कधीही 'यूपीवूड' होणार नाही; नवाब मलिकांचा टोला
दादासाहेब फाळकेंसारख्या कलाकारांनी बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, त्यामुळे बॉलीवूड कधीही यूपीवूड होऊ शकत नाही योगींनी लक्षात घ्यावं असं नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.
मुंबई : मुंबईत बॉलिवूड आहे, हॉलिवूड नंतर बॉलिवूडचं नाव आदरानं घेतलं जातं. हेच बॉलिवूड देशाच्या अर्थव्यवस्थेत तीन टक्के वाटा देतं. परंतु सध्या भाजपचे लोक बॉलिवूडला अशा प्रकारच्या खोट्या कारवाया करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी भाजपला पाठिंबा देणारे काही अभिनेते नोएडाला जाऊन त्याचं प्रमोशन करत आहे. ज्यावेळी योगी आदित्यनाथ बॉलिवूड उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यासाठी आले होते त्यावेळी मुंबईतील काही अभिनेत्यांनी ताज हॉटेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. दादासाहेब फाळकेंच्या सारख्या कलाकारांनी बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे योगींनी लक्षात घ्यावं की "बॉलीवुड कधीही यूपीवूड" होऊ शकत नाही, आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर बोलत असताना नवाब मलिक म्हणाले की, सध्या भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकतो आहे हे स्पष्ट व्हायला लागलं आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे असणाऱ्या बाबी उघड होऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांची फडफड व्हायला लागली आहे.
सोशल मीडियात आमच्यावर टीका करण्यापेक्षा कोर्टात जावं या क्रांती रेडेकर यांच्या वक्तव्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, आम्ही लवकरच विविध ठिकाणी याबाबत तक्रारी आणि पुरावे देणार आहोत. जर त्या यंत्रणांनी आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर नक्कीच आम्ही याबाबत पीआयएल देखील दाखल करू.
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना आज जामीन मंजूर केला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. अटकेत घेल्यानंतर तिघांनाही 25 दिवसांनी जामीन मिळालाय.
या प्रकरणातील तीन मुख्य व्यक्तींना जामीन मिळाल्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासावर शंका घेणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया देताना हे संपूर्ण प्रकरणच फर्जीवाडा असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय.
माननीय उच्च न्यायालयाने क्रुज ड्रग्ज प्रकरणामध्ये आज तिघांना जमीन दिलाय, दोघांना कालच दिलाय. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये एनसीबीने युक्तीवाद केला तो पाहता हे प्रकरण खालच्या कोर्टामध्येच जामीन देण्यासारखं होतं, असं नवाब मलिक म्हणाले. तसेच एनसीबीचे वकील रोज नवीन नवीन युक्तीवाद करत होते. लोकांना जास्त दिवस कसं तुरुंगात ठेवता येईल यासाठी ते युक्तीवाद करत राहिल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
मी आज पुन्हा सांगतोय की हे सर्व प्रकरण फर्जीवाडा आहे, या सर्व पोरांना कुठेतरी वानखेडेंनी जाणूनबुजून अडकवलेलं आहे असं नवाब मलिक म्हणाले.
संबंधित बातम्या :