Navneet Rana vs Shivsena : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा पठण यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुपल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यायचं ते म्हणजे, नवनीत राणा (Navneet Rana) यांचं. काही दिवसांपूर्वी बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राणा दाम्पत्यानं थेट मातोश्रीला टार्गेट केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आक्रमक झाले. आज सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे आज शिवसैनिकांसाठी मंदिर असणाऱ्या मातोश्रीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार हे मात्र नक्की. त्यापूर्वी मातोश्री आणि लगतच्या परिसरात शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. 



"हिम्मत असेल तर वांद्रे (पूर्व) येथे येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहेत." , अशा आशयाचे पोस्टर मातोश्री लगतच्या परिसरात झळकल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेल्या आव्हानानंतर संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्यानं मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, मातोश्रीबाहेर खडा पाहारा देण्यास सुरुवात केली. काल रात्री (शुक्रवारी) स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पाहारा देणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना घरी जाण्याची विनंती केली. 


तुम्ही जा घरी, 'मातोश्री' समोर यायची कुणाची हिंमत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली. मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही असा आक्रमक बाणा उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. 'मातोश्री'समोर जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. तुम्ही जा घरी, 'मातोश्री' समोर यायची कुणाची हिंमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना म्हटलं. तसेच, शिवसेनेला डिवचू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी दिली असून आज अनेक शिवसैनिक 'मातोश्री' बाहेर जमा झाले आहेत. 


हनुमान चालिसा पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम


कितीही विरोध झाला तरी आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. यावेळी त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम असल्याचे सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :