मुंबई: मोहित कंबोज हे शिवसैनिकांवर हल्ल्याच्या पवित्र्यात होते, त्यांच्या गाडीत अॅसिड आणि हॉकी स्टिक्स असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मोहित कंबोज हे 'मातोश्री' परिसरात रेकी करण्यासाठी आले होते असाही आरोप त्यांनी केला आहे.


एका लग्नाला उपस्थिती लावल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज 'मातोश्री' बाहेरुन जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, "मोहित कंबोज हे या परिसरात रेकी करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या गाडीत अॅसिड आणि हॉकी स्टिक्स होत्या. ते शिवसैनिकांवर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होते. या ठिकाणी येऊन त्यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचं काम केलं."  


खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज म्हणाले की, "आपल्या जीवाला धोका असल्याचं या आधीच आपण मुंबई पोलिसांना सांगितलं होतं, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज झालेल्या या हल्ल्याची तक्रार आपण सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत."


विनायक राऊत यांनी सलिम जावेदच्या स्टोरीमध्ये आणखी काही पात्रं अॅड करु नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 


देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला निषेध
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही."


महत्त्वाच्या बातम्या :