Traffic Police : वाहतूक पोलिसाला (Traffic Police) कार चालकाने भरपावसात गाडीच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना नवी मुंबईत घडली. हा वाहतूक पोलीस कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला अडवत होता. परंतु चालकाने थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घालत त्याला पुढे फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत. आहे. या उन्मत्त कार चालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आज सकाळी खारघर इथे हा प्रकार घडला. गादेकर असं या वाहतूक पोलिसाचं नाव आहे. गादेकर हे कोपरा उड्डाण पुलाजवळ कोपरा ड्युटी करत होते. बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या गादेकर यांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार चालकाला अडवले. त्यावेळी वाहतूक पोलीस गादेकर यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार चालकाने कार थांबवली नाही. गादेकर यांनी कारच्या समोर येत चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. आपण कारच्या पुढे आहोत हे पाहिल्यावर कार चालक गाडी थांबवेल असे गादेकर यांना वाटलं. मात्र तरीही चालकाने कार थांबवता तशीच त्यांच्या अंगावर घातली. गादेकर यांना भर पावसात बोनेटवरुन जवळपास 100 मीटर फरफटत नेलं.


वाहतूक पोलीस कर्मचारी गादेकर हे बोनेटवर असल्याचं पाहूनही चालकाने कार न थांबवता पुढेच रेटली. हे दृश्य रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी पाहिलं. यावेळी हे वाहनचालक मदतीला सरसावले. पोलिसाला बोनेटवरुन घेऊन जाणाऱ्या या कार चालकाला त्यांनी थांबवलं. यानंतर गादेकर यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


कार चालकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी उन्मत्त कार चालकाविरोधात खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


याआधी पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेल्याचे प्रकार
दरम्यान वाहतूक पोलिसाला अशाप्रकारे बोनेटवरुन फरफटत नेल्याचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधी मुंबई, नागपूरमध्ये अशाच घटना घडल्या होत्या. वाहतूक पोलिसाने अडवल्याने किंवा कोणती कारवाई केल्याच्या रागातून वाहनचालकांनी पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्याला बोनेटवरुन फटफटत नेल्याचे प्रकार घडले होती. सप्टेंबर 2021 मध्ये मुंबईतील अंधेरीमध्ये तर डिसेंबर 2021 मध्ये कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं होतं.


इतर महत्त्वाच्या बातम्या