Mumbai Crime : अटक टाळण्यासाठी 25 वर्षीय चोराने थेट एका रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. या दुर्घटनेत त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात शुक्रवारी (8 जुलै) ही घटना घडली. रोहित असं मृत चोराचं नाव आहे. 


मरिन ड्राईव्ह परिसरातील जयंत महल सोसायटीतील रहिवासी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चोर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास इमारतीत घुसला होता. इमारतीच्या एका गेटवर वॉचमन तैनात होता. त्यामुळे चोराने दुसऱ्या गेटवरुन उडी मारुन इमारतीत प्रवेश केला. चोर घुसल्याचा संशय असल्याने सुरक्षारक्षकाने तातडीने अलार्म वाजवून इमारतीमधील रहिवाशांना सतर्क केलं. त्यानंतर एका रहिवाशाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.


पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी इमारतीजवळ दाखल झाले. पोलिसांना पाहताच हा चोर ड्रेनेज पाईप आणि खिडकीचा वापर करुन इमारतीवर चढू लागला आणि खिडकीच्या कडेला उभा राहिला. पोलिसांनी त्याला अटक होणार नाही असे आश्वासन देऊन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्याचा निर्णय घेतला.


अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकची सुरक्षा जाळी धरली आणि त्याला त्यात उडी मारण्यास सांगितलं. काही रहिवाशांनी तर त्याला चौथ्या मजल्यावरील एका घरात जाण्यास सांगण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. सुमारे तीन तासांच्या समजुतीनंतर सकाळी 7.15 च्या सुमारास सेफ्टी बेल्ट वापरुन एक पोलीस कर्मचारी चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उतरला. पोलीस कर्मचारी त्याच्याजवळ जाताच त्या व्यक्तीने चौथ्या मजल्यावरुन शेजारील विश्व महल इमारतीच्या कंपाऊंडमध्ये उडी मारली.


यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रोहित असं या मृत चोराचं नाव आहे. पोलीस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. या चोराला हिंदी आणि बंगाली अशा दोन भाषा येत असल्याचं तिथे असलेल्या पोलिसाने सांगितलं. 


पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने रोहित इमारतीत घुसला होता.  पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून रोहितवर भारतीय दंड संहितेच्या कलम 511 (आजीवन कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा प्रयत्न) आणि 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या