Pune News Update : वाहनधारकांडून नियमांचे पालन झाले नाही तर वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. नियमानुसार दंड आकारणी केली जाते. परंतु, पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव टोल नाका येथे गाडीची सर्व कागदपत्रे असताना देखील गाडीत पत्त्यांचे दोन कॅट सापडल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसाकडून दंडाची मागणी करण्यात आली. परंतु, गाडीतील तरूणांनी संबंधित वाहतूक पोलिसाला पत्याचे कॅट गाडीत न बाळगणे कोणत्या वाहतूक कायद्यात आहे? याची विचारणा करताच दंडाची रक्कम मागणारा वाहतूक पोलीस पुरताच गोंधळून गेला. दंड देण्यास तयार आहे, परंतु, आम्हाला नियम दाखवा अशी मागणी तरूणांकडून करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसाला नियम तर दाखवता आला नाहीच शिवाय सहकारी पोलिसाच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा टाकण्याची वेळ आली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
काय आहे घटना?
पुण्यातील काही होतकरू युवक रंगकर्मी मंडळी मुंबईमध्ये त्यांची नेहमीची कामे आणि मीटिंगसाठी त्यांच्या कारमधून जात होते. यावेळी तळेगाव टोलनाका येथे एका वाहतूक पोलिसाने या तरूणांची कार अडवली आणि कागदपत्रांची मागणी केली. यावेळी वाहनचालकाकडे वाहन परवाना, नोंदणी, प्रदूषण प्रमाणपत्र अशी सर्व गाडीची कागदपत्रे होती. संबंधित पोलिसाने त्यांची तपासणी केली. शिवया त्याने सर्व गाडीची देखील तपासणी केली. त्यातही काही आक्षेपार्ह सापडले नाही. मात्र, गाडीत पत्त्यांचे दोन कॅट सापडले. यावरून संबंधित पोलिसाने तरूणांना तुम्ही दोन नंबरचे धंदे करता पावती करावी लागेल असा तगादा लावला.
पावती करण्यासाठी तगादा
वाहन चालकाकडे सर्व कागदपत्रे असताना देखील गाडीत कॅट सापडल्याचा मुद्दा पकडत, तुमच्या गाडीत पत्ते सापडले आहेत, याचाच अर्थ तुम्ही दोन नंबरचे धंदे करता, जुगार खेळता असा आरोप वाहतूक पोलिसाने तरूणांवर केला आणि युवा रंगकर्मींकडून दंड, पावती उकळण्याचा तगादा लावला.
या सर्व अनपेक्षित प्रकारानंतर देखील ते युवक डगमगले नाहीत. आपण कोणतीही चूक केलेली नाही, तर विनाकारण हा जाच का सहन करायचा? अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाडीमध्ये पत्ते ठेवणे हे नियमबाह्य आहे, असे कोणत्या नियमात सांगितले आहे? तो नियम दाखवा अशी विचारणा देखील या पोलिसाकडे केली. तसा जर नियम असेल तर आम्ही लगेच दंडाची रक्कम भरण्यास तयार आहोत, असे देखील या युवकांनी ठणकावून सांगितले.
पोलिसाला फोडला घाम
युवकांच्या या पवित्र्यानंतर संबंधित पोलीस गोंधळून गेला. त्याने चक्क रस्ता दुभाजकावरून उडी मारून पलीकडील बाजूस असलेल्या आपल्या पोलीस चौकीकडे पलायन केले. मात्र , हे युवक देखील इरेला पेटले होते. त्यांनी या पोलिसामागे जात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चौकीपर्यंत पाठलाग केला आणि तेथे त्याला जाब विचारण्यास सुरूवात केली. युवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तिथे अजून एक वाहतूक पोलीस आला आणि त्याने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले.
वरिष्ठांकडे तक्रार
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पुढील कामासाठी वेळ झाल्यामुळे तरूण तेथून निघून गेले. मात्र, याबाबत त्यांनी संबंधित वाहतूक पोलिसाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शिवाय उद्या हे तरून वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे संपूर्ण प्रकरण त्यांच्यासमोर ठेवणार आहेत, अशी माहिती वाहनचालकाने एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.