मुंबई : साकीनाका अत्याचार घटनेत मृत्यूशी झुंजत असलेल्या निर्भयाचा अखेर मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा अशा आशयाचं पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं आहे. 


राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्या म्हणतात की, "साकीनाका अत्याचार पीडितेचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. पोलीस  सर्व आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. या घटनेची सुमोटो दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्ताकडे करण्यात येत आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना लागेल ती मदतही पुरवण्यात यावी अशीही विनंती करण्यात येत आहे."


 






मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. 


या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.


संबंधित बातम्या :