नरिमन पॉईंट, कफ परेड, मंत्रालयसह बराच भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार, BMC आयुक्तांना इशारा
कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह 80 टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. 2050 म्हणजे 25-30 वर्ष फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.
मुंबई : वातावरण बदलाचा (Climate Change) परिणाम येत्या काळात मुंबईतही जाणवणार असं अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही इशारा दिला की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण मुंबईचा बराचसा परिसर 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल. यामध्ये मुंबईची शान असलेला नरिमन पाँईट, मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल 27 ऑगस्ट रोजी शुक्रवारी मुंबई हवामान बदल नियोजनाबाबतच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात इकबाल सिंह चहल बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा 70 टक्के भाग हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांमुळे पाण्याखाली जाईल.
निसर्ग इशारा देत आहे पण नागरिकांना काही जाग येत नाहीये. मात्र हीच स्थिती काय राहिली तर परिस्थिती गंभीर होईल. कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह 80 टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. 2050 म्हणजे 25-30 वर्ष फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.
मुंबई किनारपट्टीवर 'निसर्ग' सारखं चक्रीवादळ129 वर्षांत पहिल्यांदा धडकलं. त्यानंतर मात्र गेल्या 15 महिन्यांत तीन चक्रीवादळं मुंबई किनारपट्टीवर आली. 5 ऑगस्ट 2020 रोजी नरिमन पॉईंटजवळ पाच-साडेपाच फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे निसर्गाकडून संकेत मिळत आहेत, ते आपण ओळखून योग्य पावलं उचलली पाहिजेत. तसं न झाल्यास त्याचे परिणाम पुढच्या पिढीला नाही, तर आताच्या पिढीलाही भोगावे लागतील. हवामानबदलासाठी स्वतःचं नियोजन तयार करून त्यावर काम करणारं मुंबई हे दक्षिण आशियातलं पहिलं शहर आहे,' असंही चहल यांनी स्पष्ट केलं.
दोन महिन्यांपूर्वी मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. मुंबईत 6 आणि 7 जूनदरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र यावेळ वादळामुळे 17 मे रोजीच 214 मिमी पाऊसाची नोंद झाली. 9 जूनपूर्वी, मुंबईत जूनच्या 84 टक्के पावसाची नोंद झाली आणि जुलैमध्ये, महिन्याच्या सरासरीच्या 70 टक्के पाऊस फक्त चार दिवसांत 17 ते 20 जुलै दरम्यान झाला, ही स्थिती भयानक आहे.