नालासोपारा (Nalasopara News) : अवयवदान (organ donation)हे किती श्रेष्ठ दान असू शकतं हे एका चार वर्षीय मुलीसह आणखी काही रुग्णांच्या वाचलेल्या जीवावरून लक्षात येईल. नालासोपारा येथील 73 वर्षीय रहिवासी स्वर्गीय प्रभाकर तेंडुलकर यांनी आपल्या वयाच्या 35व्या वर्षीच अवयवदानाची इच्छा लिहून ठेवली होती. प्रभाकर तेंडुलकर यांना 19 ऑक्टोबर रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊन ब्रेन स्टेम डेड झाल्यामुळे कुटुंबियांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली. या इच्छेमुळे एका चार वर्षीय मुलीचा जीव तर वाचलाच शिवाय आणखीही पाच जणांना जीवदान मिळालं. 


स्वर्गीय प्रभाकर तेंडुलकर यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्यानंतर मीरा रोड येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ब्रेन स्टेम डेड झाल्याचं शासकीय वैद्यकीय समितीने जाहीर केलं. रुग्ण बरा होण्याच्या पलीकडे गेल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार अवयवदान करण्याचा निश्चय घेतला.


त्यानुसार त्यांचा मुलगा कौस्तुभ तेंडुलकर, पुतण्या अजित तेंडुलकर, जावई प्रभाकर कुडाळकर यांनी आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केले. या प्रक्रियेत भावना शहा, अशोक ग्रोवर यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती अवयव दान चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पवार यांनी दिली. स्वर्गीय प्रभाकर तेंडुलकर यांच्या यकृताचे दोन भाग करण्यात आले असून ते एका मुलीवर आणि एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. मूत्राशय दोन रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात येतील तसंच त्वचाही गरजू रुग्णांना मिळणार आहे. 


ही बातमी देखील वाचा- Latur News : ब्रेन डेड असलेल्या लातूरच्या सिंधुताई तळवार यांचे अवयवदान! 3 गरजू रूग्णांना मिळाले नवजीवन


एकूणच या अवयवदानामुळे किमान पाच ते सहा रुग्णांना जीवदान मिळाल्याचं देहदान चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काही वर्षांपूर्वी वसई विरार भागातून अवयवदान आणि देहदान चळवळ सुरू केली होती. सुरुवातीच्या काळात हा प्रवास काहीसा कठीण होता. मात्र चळवळीचा चिवट पाठपुरावा आणि जनजागृती केल्यामुळे ही चळवळ बळकट होत आहे. 


पवार यांचं हे कार्य आता राज्यभर पसरलं आहे. राज्याच्या विविध भागात ते अवयवदान आणि देहदान याविषयी सातत्याने प्रबोधन करत आहेत. आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू पाहणं हे खरंतर प्रत्येक कुटुंबाला अवघड असतं मात्र अवयवदानामुळे वाचलेल्या जीवांमुळे आपला माणूस आपल्यात अजूनही कुठेतरी त्यांच्या रूपात जीवंत असल्याची जाणीव त्यांच्या कुटुंबियांना करून देतं. 


स्वर्गीय प्रभाकर तेंडुलकर या अवयवदानाच्या निर्णयामुळे इतरांनाही अवयवदानाची प्रेरणा मिळेल, असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.