Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. राऊतांचा कारागृहातील मुक्काम 13 दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, संजय राऊतांना 2 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. 

Continues below advertisement


संजय राऊतांवर आरोप नेमके काय? 


पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. 


ईडीचा दावा काय?


दरम्यान, ईडीने (ED) केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.


पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं काय? 


शिवसेना खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (MHADA) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत (Pravin Raut) यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आलं होतं.