Balloon Blast in Car: सुपरहिरोच्या थीमवर आधारीत असलेल्या बर्थ डे पार्टीचा (Birthday Party) शेवट दु:खद अपघाताने झाला. वाढदिवसाच्या पार्टीसाठी असलेले फुगे (Birthday Party Ballon) कुटुंबासाठी जीवघेणे ठरले असते. कारमध्ये ठेवलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने तीन जण जखमी झाले. या स्फोटामुळे कारला आग लागली. मुंबईतील अंधेरी (Mumbai News)भागात ही घटना घडली. जखमींमध्ये वाढदिवस असणाऱ्या चार वर्षीय मुलाचा समावेश आहे. फुगे विक्रेत्याने फुग्यात हेलियमऐवजी हायड्रोजन (Hydrogen in Birthday Party Balloon) भरल्याने हा अपघात झाल्याचा दावा जखमींनी केला आहे.


'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, कारमध्ये झालेल्या स्फोटातील जखमींमध्ये समावेश असलेल्या मुलाच्या आईने सांगितले की, वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो. पार्टीत असणारे काही फुगे आम्ही कारच्या बूटस्पेसमध्ये ठेवले. आम्ही इमारतीच्या गेटजवळ पोहचलोदेखील होतो. नेमके त्याचवेळी फुग्यांचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. त्याच्या परिणामी आग लागल्याने धूर झाला. कारच्या मागील सीटवर चार वर्षांचा मुलगा होता. तो यामध्ये भाजला गेला. 


फुग्यांमुळे एवढा मोठा अपघात होऊ शकतो, हे कोणाला माहीत होते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फुग्यात हेलियमऐवजी हायड्रोजन आहे, याची कल्पना फुगे विक्रेत्याने द्यायला हवी होती, असेही त्या महिलेने सांगितले. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीन जखमींपैकी एकाला 12 दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे मुलगा धास्तावला असून थोडा मोठा आवाज झाली तरी घाबरतो, असेही अपघातात जखमी झालेल्या महिलेने सांगितले. 


वाढदिवसाच्या पार्टीसाठी या कुटुंबाने अंधेरीतील एक हॉल बुक केला होता. पार्टीसाठी डी. एन. नगरमधील एका फुगे विक्रेत्याला 80 फुग्यांची ऑर्डर दिली होती. त्याने याचे 1600 रुपये होतील असे सांगितले. मात्र, फुग्यात हेलियम ऐवजी हायड्रोजन असेल अशी कोणतीही माहिती दिली नसल्याचे महिलेने सांगितले.  


तर, दुसरीकडे फुगे विक्रेत्याने फुग्यात हायड्रोजन वापरल्याने मान्य केले. मात्र,  त्यांनी ग्राहकांना याची कल्पना असल्याचा दावा केला. आम्ही मागील 12 वर्षांपासून हा व्यवसाय करत असून दिवसभर हायड्रोजन सिलेंडरजवळ उभे राहत असल्याचे सांगितले. फुग्यांजवळ ज्वलनशील पदार्थ असल्याशिवाय हायड्रोजन पेट घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हायड्रोजन फुग्याच्या संभाव्य धोक्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे जखमी कुटुंबाने म्हटले. 


मुंबई आयआयटीतील एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक आर. के. पंत यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, स्फोट होण्यासाठी ज्वलनशील पदार्थजवळ असावा हे गरजेचे नाही. एसी कारमध्ये असलेल्या फुग्यांमधून गळती आणि मोबाइल फोनचा वापर याच्या एकत्रित परिणामामुळे स्फोट झाला असावा असेही त्यांनी म्हटले. फुग्यांमध्ये हायड्रोजनचा वापर थांबवणे हा पर्याय असू शकत नाही. मात्र, लोकांनी हायड्रोजन वापराच्या धोक्याबाबत जागरुक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.