Latur News : ब्रेन डेड असलेल्या लातूरच्या सिंधुताई तळवार (Sindhutai Talwar) यांच्या अवयवदानामुळे सर्वत्र चर्चा होत आहे, कारण सिंधुताई यांच्या मुलांनी घेतलेल्या या निर्णयाने 3 गरजू रूग्णांना नवजीवन मिळाले आहे. सोलापूरात (Solapur) या अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून तळवार कुटुंबियांच्या निर्णयाला लातूर जिल्हा प्रशासनाची देखील साथ लाभली आहे. 


केवळ शेवटच्या श्वासाची प्रतिक्षा 
लातूर शहरातील 64 वर्षीय सिंधुताई सिद्राम तळवार यांना अर्धांगवायूचा झ्टका आला होता. यात त्यांच्या मेंदूला गंभीर ईजा झाली होती. त्यांना तात्काळ लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी सिंधुताई या ब्रेन डेड झाल्याचं निदान केलं. आता त्यांच्या कुटुंबियांच्या हातात केवळ शेवटच्या श्वासाची प्रतिक्षा करणेच होते. त्यावेळी सिंधुताई यांची चर्चा सुरू झाली. त्यांचे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले जावई विजय कोळी यांच्या चर्चेतून अवयव दान करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. विजय कोळी यांचे सहकारी विजय माळाळे, रामेश्वर गिल्डा यांनी समुपदेशन करून कुटुंबियांना या सर्वोच्च दानासाठी प्रेरित केले. सिंधुताई तळवार यांच्या मुलांनी घेतलेल्या या निर्णयाने 3 गरजू रूग्णांना नवजीवन मिळाले आहे. 


अवघ्या दोन तासात अवयवदानाची प्रक्रिया
कुटुंबियाच्या होकारानंतर ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तात्काळ कामास सुरुवात केली गेली. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, यांना माहिती देण्यात आली. लगेच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख, डॉ संतोष डोपे, डॉ उदय मोहिते यांना या घटनेची माहिती दिली गेली. आणि अवघ्या दोन तासात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अवयवदान संकल्पाला पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. 


अवयव पुण्याला नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर
काही कारणास्तव ही प्रक्रिया लातूरमध्ये करणे शक्य नव्हते. तेंव्हा लातूर जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून ही प्रक्रिया यशस्वी होईल याची पूर्ण खात्री केली. त्याच दिवशी रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टर आणि सोबत अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यासह सिंधुताई यांना सोलापूरला नेण्यात आले. तेथील सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून आज सोलापूरमध्ये अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यात किडनी, लिव्हर, डोळे अशा तीन अवयवांचे तीन गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. हे अवयव पुणे येथे नेण्यासाठी सोलापूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला.